सोमवार, १३ मार्च, २०२३

कृषी प्रदर्शनात जनहिताच्या योजनांची प्रचार व प्रसिद्धी करा शासकीय यंत्रणांना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली दि. 13 (जि.मा.का.) : शासन शेती आणि शेतकऱ्यांसाठी कृषी विकासाच्या अनेक योजना राबवित आहे. या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरत असून सांगली येथे 17 ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील कार्यान्वयीन यंत्रणांनी शासनाच्या जनहिताच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल लावून योजनांची प्रचार व प्रसिद्धी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका व जिल्हा परिषद सांगली यांच्या सहकार्याने जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली व प्रकल्प संचालक आत्मा सांगली यांच्यावतीने कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग सांगली येथे दि. 17 ते 21 मार्च 2023 या पाच दिवसाच्या कालावधीत आयोजित कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी विनामुल्य असून सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखालील बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकचे प्रबंधक महेश हरणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, कृषी उपसंचालक प्रियांका भोसले, यांच्यासह कृषी विभाग व जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देणे, प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपापसातील विचारांची देवाण-घेवाण करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे, आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांना अर्थिकदृष्ट्या उन्नत करणे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विषयक अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री करणे, दुर्लक्षित झालेल्या पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्व ग्राहकांना पटवून देऊन या पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे, विविध चर्चासत्र व परिसंवादाच्या माध्यमातून अद्यावत तंत्रज्ञान / कृषि व संलग्र विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. कृषी प्रदर्शनात 200 पेक्षा जास्त स्टॉल असून 40 स्टॉल शासकीय विभागांसाठी आहेत. शासकीय कार्यालयांना स्टॉल वाटपासाठी कृषी विभागाने समिती गठीत करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. कृषी प्रदर्शनाबाबत माहिती देताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले, कृषी प्रदर्शनात धान्य व फळ महोत्सव आणि विविध विषयावरील परिसंवाद / चर्चासत्राचे आयोजन केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषीत केले आहे. पौष्टिक तृणधान्य पिकाच्या उत्पादन वाढीबरोबरच या पिकांच्या आरोग्यविषयक फायद्याबाबत जनजागृती करून लोकांच्या आहारातील त्यांचे प्रमाण वाढविणे या प्रमुख उद्देशाने महोत्सवामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकासाठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. यामध्ये पौष्टिक तृणधान्य उपपदार्थांचे प्रदर्शन व विक्री, पौष्टिक तृणधान्ये रेसिपी व पौष्टिक तृणधान्य सेल्फी पॉईंट इ. चा समावेश राहणार आहे. त्याचबरोबर महोत्सवामध्ये धान्य व फळ महोत्सव, उत्पादन ग्राहक थेट विक्री, विक्रेता खरेदीदार संमेलन, प्रगतशील शेतकरी सन्मान, कृषी निविष्ठा, कृषी तंत्रज्ञान, सिंचन, गृहउपयोगी वस्तू, विविध खाद्यपदार्थ, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित औजारे, धान्य फळपिके, फुल पिके यांचे नमुने, महिला बचत गटांच्या पाककृती व फळ पिकाची कलमे / रोपे इत्यादी दालनांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी दिली. कृषी प्रदर्शनामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके, ट्रॅक्टर व सुधारित औजारे, सिंचन साधने, फळे भाजीपाला कलमे/ रोपे उत्पादक/ वितरक यांना प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन स्टॉल बुकींग करावयाचे असल्यास कृषि विभागाचे संदीप खरमाटे, कृषि सहाय्यक मो.क्र. ७९७२६५१४७१/ ९८५०९०३४६५ व श्री. अमित चव्हाण तंत्रज्ञान व्यवस्थापक मो. क्र. ९८९०३२१९८३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा