मंगळवार, २१ मार्च, २०२३

शिर्डी येथील महापशुधन एक्स्पो 2023 पशु प्रदर्शनास आवश्य भेट द्या - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 21 (जि. मा. का.) : देशातील सर्वात मोठे 'महापशुधन एक्स्पो 2023' शिर्डीच्या शेती महामंडळाच्या 46 एकर विस्तीर्ण जागेत भरणार असून देशभरातील 5 हजार पेक्षा जास्त पशु-जनावरे या प्रदर्शनास असणार आहेत. 10 लाखांपेक्षा जास्त पशुप्रेमी या प्रदर्शनास भेट देण्याची शक्यता आहे. 500 हून अधिक स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. शेतकरी, पशुपालक व होतकरू तरूणांसाठी हे महा एक्स्पो पाहणे म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. या प्रदर्शनाचे 24 ते 26 मार्च 2023 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोसाठी येणाऱ्या पशुपालक पशुप्रेमींच्या वाहन पार्किंगसाठी 100 एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. या महापशुधन एक्स्पो 2023 या प्रदर्शनास सांगली जिल्ह्यातील पशुपालक, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाएक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी 13 राज्यातील पशुपक्षी व पशुपालक या मेळाव्यास सहभाग नोंदविणार आहेत. 18 विविध प्रकारच्या चारा-पिके बियाणांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकार या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत. मुरघास, ॲझोला, हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे नविन तंत्रज्ञानाव्दारे उत्पादन करून जनावरांना सकस हिरवा चारा कसा उपलब्ध करून देता येईल याचे प्रात्यक्षिक या प्रदर्शनात असणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांच्या स्टॉलच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याचे पशुसंवर्धन विषयक वैशिष्ट्यांची माहिती सर्वसामान्य जनतेसाठी खुली असणार आहे. त्या त्या राज्यातील व जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे वैशिष्ट्यपूर्ण पशुधन या प्रदर्शनात प्रत्यक्ष सहभागी असणार आहे. गाय, म्हैस, शेळी-मेंढी, कोंबडी, श्वान, वराह व अश्व अशा विविध प्राण्यांचे सर्वोत्कृष्ट प्रजातीय प्रकार, सांगली जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रजातीची माडग्याळ मेंढी व खिल्लार जातीची वैशिष्ट्यपूर्ण जातिवंत आटपाडी खिलार जनावरे महाएक्स्पो मध्ये पहावयास मिळणार आहेत. शेतकरी व पशुपालकांसाठी उपयुक्त ठरणारे वैरण विकास, दुग्ध व्यवसायातील आव्हाने, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन या विषयावरील तांत्रिक चर्चासत्रे या ठिकाणी होणार आहेत. चर्चासत्रांमध्ये पशुपालक व शेतकरी सहभाग घेऊ शकतात. पशुसंवर्धन विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. मुक्त संचार गोठा कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून शासकीय योजनांचे सादरीकरण केले जाणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त अजय थोरे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी दिली. महा एक्स्पोमध्ये डॉग व कॅट शो आयोजित केले आहे. ‍विविध जातीचे अश्व यामध्ये सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशुविज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचा या प्रदर्शनात सक्रिय सहभाग राहणार आहे. महापशुधन एक्स्पो म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पद्धतीने पशुपक्षी पालन व वैरण उत्पादन करण्यासाठी शेतकरी व पशुपालक यांच्यासाठी पर्वनीच ठरणार आहे. याचा सांगली जिल्ह्यातील शेतकरी, पशुपालक व युवकांनी लाभ घ्यावा व जिल्ह्याची उत्पादकता वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा