मंगळवार, २१ मार्च, २०२३

कृषी योजनांच्या यशस्वीतेसाठी वित्तीय संस्था व बँकांचा सहभाग महत्त्वाचा - मेघनाथ कांबळे

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : सांगली जिल्ह्यामध्ये कृषी पायाभूत सुविधा योजना राबवण्यासाठी खूप वाव असून सर्व संलग्न संस्थाने एकत्र येऊन काम केल्यास दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिकचे काम होऊ शकते. योजना राबवत असताना जिल्ह्यातील वित्तीय संस्था व बँकांची भूमिका व सहभाग फार महत्त्वाचा आहे. संबंधित वित्तीय संस्था व बँकांनी लाभार्थ्यांच्या प्राप्त प्रस्तावांना वेळेत व गरजेनुसार कर्ज रक्कम मंजूर करणे व वाटप करणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन कृषी आयुक्तालय पुणे चे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी केले. सांगली येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे औचित्य साधून कृषी पायाभूत सुविधा निधी कृतीसंगम कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक महेश हरणे, नाबार्डचे व्यवस्थापक निलेश चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या उर्मिला राजमाने, तासगाव तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर आदि उपस्थित होते. राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे म्हणाले, लाभार्थीने त्यांचे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव बँकांकडे संबंधित कागदपत्रांसहित जमा केल्यास बँकांच्या माध्यमातून लवकरात लवकर कर्ज प्रस्ताव निकाली काढले जाऊ शकतात. योजनेतील पात्र प्रकल्पांविषयी बोलताना ते म्हणाले, भविष्यांमध्ये या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतीमध्ये मोठी क्रांती होऊ शकते. कृतीसंगम कार्यशाळेमध्ये उर्वरित तीन वर्षांमध्ये जिल्ह्यातील विविध बँकांच्या 530 शाखांनी कमीत कमी एक शाखा एक प्रकरण राबवण्याविषयी संकल्प घेण्यात आला. जेणेकरून जिल्ह्यांमध्ये पुढील तीन वर्षात कमी कमी पंधराशे कोटी पर्यंतचा लाभ आपण जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देऊ शकतो. प्रास्ताविकात श्री. सुर्यवंशी यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या विविध लाभांविषयी माहिती देऊन जिल्हामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करण्यात येईल असे सांगितले. तालुका कृषी अधिकारी सर्जेराव अमृतसागर यांनी कृती संगम कार्यशाळेची पार्श्वभूमी सांगितली. या कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, कांचनपूर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी संशोधन केंद्र, सहकार व पणन मंडळ, पशुसंवर्धन विभाग व इतर शासकीय विभागांनी सहभाग घेतला. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा