मंगळवार, २८ मार्च, २०२३

मिरज दर्गा येथे आवश्यक सुविधांसाठी सर्व समावेशक आराखडा सादर करा - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी दर्ग्याचा आणि मिरज येथील सर्व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिल्या. मिरज येथील ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा हा सुमारे 600 वर्षापूर्वीचा असून दर्ग्याच्या मूळ स्वरूपात कोणताही बदल न करता सौंदर्य व पावित्र्य याचा समतोल राखत नवीन विकास आराखडा येत्या दोन आठवड्यात सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले. ख्वाजा शमशोद्दीन मिरासाहेब दर्गा व अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक स्थळे विकसित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पालकमंत्री डॉ. खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकास आराखडा करताना दर्ग्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. दर्ग्यासमोरील अतिक्रमणे काढावीत. आराखड्यामध्ये वाहनतळ, सर्व सोयीयुक्त यात्री निवास, नगारखाना, प्रवेशव्दार व कमान, फायर फायटिंग, सोलर सिस्टिम, अंडरग्राउंड वायरिंग, चौक सुशोभिकरण व दर्ग्याच्या शेजारी असणाऱ्या सरपंच कार्यालयाचे नूतनीकरण या बाबीनाही प्राधान्य द्यावे. याबरोबरच इदगाह मैदान, खासबाग परिसर, अनुभव मंडप, तंतूवाद्य भवन, चर्मकार समाज भवन आदी बाबींचा सर्व समावेशक विकास आराखडा समावेश करावा. जैन समाजाच्या मुलांसाठी असलेल्या वस्तीगृहाची दुरुस्ती व दीपस्तंभ, ख्रिचन समाज स्मशान भूमी व पंढरपूर रोडवर असणाऱ्या चर्च परिसरातील दुरुस्तीची कामे आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट करावीत, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा