शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

अभय योजनेचा लाभ घ्यावा - प्र. मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी

सांगली, दि. 15 (जि. मा. का.) : शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना २०२३ दोन टप्प्यात लागू केलेली आहे. या योजनेमध्ये १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत दस्ताबाबतीत शासनास देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सुट तथा सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी म्हणाले, योजनेच्या पहिल्या टप्यात १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्क रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेस माफी, मुद्रांक शुल्क १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के व दंडाची संपूर्ण सूट देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडामध्ये ९० टक्के सुट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास २० टक्के माफी तसेच १ कोटी रूपये रक्कम दंड स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेत सूट देण्यात आली आहे. योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२४ पर्यंत देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के सूट, तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम १ लाखाच्या वर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के व दंडामध्ये ७० टक्के माफी, तसेच मुद्रांक शुल्काची २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी व दंडामध्ये ८० टक्के सूट, मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात १० टक्के माफी तसेच २ कोटी रूपये रक्कम दंड म्हणून स्वीकारुन उर्वरित दंडाच्या रकमेची सूट असेल. ज्यांना मुद्रांक शुल्क भरण्यासाठी नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी अभय योजना २०२३ योजनेचा लाभ घेण्याकरिता आपला अर्ज सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, सांगली यांचे कार्यालय राजवाडा कंपौंड सांगली या कार्यालयास सादर करावा अथवा तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा