सोमवार, २८ नोव्हेंबर, २०२२

जागतिक एड्स दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

सांगली, दि. 28, (जि. मा. का.) : जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने दि. 1 डिसेंबर रोजी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षामार्फत एच. आय. व्ही. एड्स बाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. आपली एकता, आपली समानता, एचआयव्ही सहज जगणाऱ्या करिता ही यावर्षीची जागतिक एड्स दिनानिमित्तची थीम आहे. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त सकाळी 8.30 वाजता जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली या ठिकाणी करण्यात आले आहे. या प्रभात फेरीसाठी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबरोबरच प्रभात फेरीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच एनसीसी केडेट, रेड रिबन क्लब, एन एस एस चे विद्यार्थी नर्सिंग कॉलेजेस तसेच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व समलिंगी पुरुषांसाठी काम करणाऱ्या संस्था, लिंक वर्कर स्कीम एन. जी. ओ., स्थलांतरित कामगारासाठी काम करणाऱ्या संस्था, सहभागी होणार आहेत. प्रभात फेरी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली-आंबेडकर रोड-एसटी स्टँड-शिवाजी मंडई-हरभट रोड-राजवाडा चौक मार्गे जावून रॅलीचा समारोप पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक स्टेशन चौक येथे होणार आहे. या ठिकाणी एचआयव्ही प्रतिबंधाकरिता सर्व उपस्थितांना शपथ दिली जाणार आहे. त्याचबरोबर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची मतदार यादी मध्ये नाव नोंद करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये 1 डिसेंबर रोजी जनजागृती प्रभात फेरीचे नियोजन स्थानिक आयसीटीसीच्या माध्यमातून करण्यात आले असून यामध्ये एनसीसीचे कॅडेट व रेड रिबन क्लब मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवणार आहेत. तरुण वर्गामध्ये अधिकची जनजागृती व्हावी यासाठी महाविद्यालयामध्ये व अतिजोखमीच्या गटामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन, डिजिटल बॅनर, वॉल पेंटिंग, रेडिओ वर मुलाखत, स्थानिक केबल चॅनलवर स्क्रोल जाहिरात अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पोस्टर्स स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून भेदभाव व कलंक मिटवून समानता आणणे हा दोन्ही स्पर्धेचा विषय आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी ७०० रूपये, द्वितीय क्रमांक ५०० रूपये, आणि तृतीय क्रमांकासाठी ३०० रूपये अशी बक्षिसाची रक्कम असून सर्व सहभागीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे व याचे प्रदर्शन १ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित रॅलीमध्ये तसेच पोस्टर पेंटिंग स्पर्धा व रांगोळी स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा