गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०२२

संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा होणार संविधान सन्मान रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

सांगली दि. 24 (जि. मा. का.) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. २६ नोव्हेबर २०२२ रोजी संविधान दिन सांगली जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे. दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान दिनानिमित्त सांगली व तालुक्याच्या न्यायालयामध्ये संविधान उद्देशीका वाचन करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व न्यायिक अधिकारी, वकील संघटना तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग सहभागी होवून उद्देशीका वाचन करणार आहेत. तसेच विविध शाळांमध्ये संविधान रॅली, सांगली व तालुक्यांच्या शाळांमध्ये प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. सांगली येथील विधी विद्यार्थी सांगली शहरामध्ये विविध ठिकाणी कायदेविषयक जनजागृतीपर पथनाट्य सादर करणार आहेत. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रविण नरडेले यांनी दिली. दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता वेबिनारव्दारे चर्चासत्रे तसेच संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाचे महत्व या विषयावर भारती विद्यापीठ्स न्यू लॉ कॉलेज सांगली प्राचार्या डॉ. पूजा नरवाडकर, मार्गदर्शन करणार आहेत. सदरच्या वेबिनार व चर्चासत्रामध्ये सांगली येथील पॅनेल वकील, विधी विद्यार्थी, शाळेतील विद्यार्थी सहभागी होतील. तसेच त्याच दिवशी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा सांगली यांनी आयोजित संविधान दिन सन्मान रॅलीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगली हे सहभागी होवून सदर रॅलीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाची कार्ये व माहिती पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात येणार आहे. सदर संविधान सन्मान रॅलीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा