मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

लसीकरण व वाहतूक प्रमाणपत्राशिवाय गोवंशीय पशुधनास जिल्ह्यात प्रवेशास बंदी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे आदेश

सांगली दि. 15 (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या चालू झालेल्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य जिल्ह्यातील (परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, हिंगोली इ. ) जिल्ह्यातून ऊस तोड कामगाराबरोबर ऊस वाहतुकीसाठी आवश्यक बैल व इतर पशुधनांची वाहतूक चालू आहे. त्यामुळे इतर राज्यातून महाराष्ट्रात तसेच अन्य जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात लसीकरण न झालेल्या अथवा बाधित जनावरांची वाहतूक केल्यामुळे लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्यामुळे गाय वर्गीय पशुधनास विना लसीकरण प्रमाणपत्र व वाहतूक प्रमाणपत्र शिवाय जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. यासाठी पोलीस व पशुसंवर्धन विभागाने आंतरराज्य व आंतरजिल्हा सीमांवर तात्पुरते तपासणी नाके उभारावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे, तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आलेल्या तपासणी नाक्यांवर २४ तास कडक पाहणी करून विना लसीकरण प्रमाणपत्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या ऊस तोड कामगारांच्या पशुधनास प्रवेशबंदी करावी. तात्पुरत्या तपासणी नाक्यावर लसीकरण प्रमाणपत्राच्या तपासणीसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. उसतोड कामगारांची गुरे साखर कारखान्यांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर साखर कारखाना प्रशासकाकडून नेमलेल्या पशुवैद्यकामार्फत अशा गुरांची तपासणी करून गुरे ऊस वाहतुकीसाठी योग्य असल्याबाबत खातरजमा करून घ्यावयाची आहे. तसेच गुरांची दैनंदिन आरोग्य तपासणी करून एखाद्या गुरामध्ये लम्पी चर्मरोगाची लक्षणे दिसून आल्यास, अशा गुरांचे तात्काळ विलगीकरण करून तसे जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त यांना तात्काळ कळविणे बंधनकारक आहे. या रोगाची लक्षणे पशुमध्ये आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती / अशासकीय संस्था सहकारी संस्था/खाजगी संस्था संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था इ. यांनी प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियम २००९ मधील कलम ४(१) अन्वये लेखी स्वरुपात नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. यामध्ये दिरंगाई केल्यास प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध नियंत्रण अधिनियमानुसार संबंधिताविरुध्द गुन्हा नोंद केला जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आदेशात नमुद केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा