बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

लोकशाही बळकटीकरणात युवकांचा सहभाग महत्वाचा मतदार नोंदणीसाठी युवकांनो पुढे या - अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख

सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये युवकांचा सहभाग महत्वाचा आहे. लोकशाहीवरील विश्वास अधिक वृध्दींगत होण्यासाठी मतदार नोंदणी होणे आवश्यक असल्याने युवकांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 अंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी कार्यक्रमाप्रसंगी डॉ. देशमुख बोलत होत्या. कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल, खेलो इंडिया युथ गेममध्ये वेटलिफटिंग खेळातील सुवर्ण पदक विजेती युथ ऑयकॉन काजल सरगर यांच्यासह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते. डॉ. देशमुख म्हणाल्या, मतदार जन जागृतीसाठी भारत निवडणूक आयोगामार्फत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर आधारित वर्षातून चार वेळा मतदार आपल्या नावाची नोंद मतदार यादीत करु शकणार आहे. सांगली जिल्हा मतदार नोंदणीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मतदार नोंदणीमध्ये जिल्ह्याचे काम आणखी उठावदार होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करुन जिल्ह्याचा लौकिक वाढवूया. मतदार नोंदणीमध्ये वंचित घटक, दिव्यांग, तृतीयपंथी या बरोबरच देहविक्री करणाऱ्या महिलांच्या नावाचीही नोंद करुन त्यांनाही लोकशाहीच्या सशक्तीकरणामध्ये सहभागी करुन घेऊ. मतदार ओळखपत्रास आधार जोडणीमध्ये जिल्ह्याचे जवळपास 59 टक्केपर्यंत काम झाले असून 100 टक्के काम होण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात उद्या १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाल्या. श्री. बारकुल म्हणाले, लोकशाहीत मतदारांचे योगदान अनन्य साधारण असून मतदार नोंदणी ही सक्षम लोकशाहीची पहिली पायरी आहे. यासाठी तरुणांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद करण्यासाठी पुढे यावे. युवकांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी मविद्यालयस्तरावर शिबीर आयोजित करण्यात यावीत. यासाठी महाविद्यालयांनीही सहकार्य करावे. प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. बोरकर यांनी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 बाबत माहिती दिली. प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात ग्रामसभा आयोजित करण्यात आल्याचे सांगून 19 व 20 नोव्हेंबर आणि 3 व 4 डिसेंबर रोजी विशेष शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात आधार जोडणीचे 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल यांनी आभार मानले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा