मंगळवार, १५ नोव्हेंबर, २०२२

हळद व बेदाण्याचे मार्केटिंग व ब्रॅन्डिग करा - गोविंद हांडे

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत सांगलीत खरेदीदार - विक्रेता संमेलन संपन्न सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : भौगोलिक मानांकन मिळालेल्या हळद व बेदाणा या उत्पादनाचा फायदा उद्योजक, निर्यातदार यांनी घेऊन याचे मार्केटिंग व ब्रॅन्डिग करावे, असे आवाहन कृषि आयुक्तालय पुणे येथील तंत्र सल्लागार गोविंद हांडे यांनी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयामार्फत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या खरेदीदार - विक्रेता संमेलनामध्ये मार्गदर्शन करताना केले. सांगली येथे झालेल्या खरेदीदार - विक्रेता संमेलनास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, अन्न व प्रशासन विभागाचे उपायुक्त सुकुमार चौगुले, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, सुरेश पाटील, उद्योजक खरेदीदार व विक्रेते उपस्थित होते. श्री. हांडे म्हणाले, देशांतर्गत व परदेशामध्ये प्राधान्याने अंशमुक्त / विषमुक्त व प्रक्रिया केलेला माल याची मागणी आहे. अंशमुक्त शेतमाल तयार करणे व त्यावरच प्रक्रिया करणे काळाची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत तरूण उद्योजकांनी अपेडा प्रणालीवर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच उपलब्ध असलेल्या ऑनलाईन बाजारपेठ यांचा उपयोग करावा. त्यासाठी योग्य उत्कृष्ट पॅकिंग, लेबेलिंग, ब्रॅन्डिग असणे आवश्यक असल्याचे श्री. हांडे म्हणाले. कृषिमाल प्रक्रियेसाठी लागणारे परवाने, मालाचा दर्जा, मानके याबद्दल असलेले निकष याबद्दल श्री. चौगुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी खरेदीदार व उद्योजक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. उत्पादनाचा दर्जा चांगला असला पाहिजे, सांगली जिल्ह्यातून 2 लाख टन बेदाणा उत्पादन होत असून देशांतर्गत व परदेशी बाजारपेठांचा उद्योजकांनी फायदा करून घ्यावा. तसेच ऑनलाईन बाजारपेठ व सद्यपरिस्थितीतील बाजारपेठ याबद्दल चेंबर ऑफ कॉमर्स चे माजी उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. संमेलनात अमोल ढाकणे, अशोक बाफना, रोहर झँवर, वसीम फकीर, आदित्य शहा, पुनम साठम यांनी मनोगत व्यक्त केले. कृषि उपसंचालक प्रियांका भोसले यांनी प्रास्ताविकात प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेबद्दल मार्गदर्शन केले. प्रविण बनसोडे सुत्रसंचालन यांनी केले. कृषि अधिकारी प्रकाश नागरगोजे यांनी आभार मानले. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा