रविवार, १३ नोव्हेंबर, २०२२

आता .. विधी साक्षर होणे गरजेचे - न्यायमूर्ती सारंग कोतवाल

मालगाव येथे विधी साक्षरता महाशिबीर संपन्न सांगली, दि. 13, (जि. मा. का.) : नियम व कायदे हे सतत बदलत जाणारी प्रक्रिया आहे. कायदा माहित नाही हा समज न्यायालयात चालत नाही. यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा लाभ घेऊन प्रत्येकाने विधी साक्षर होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी मिरज तालुक्यातील मालगाव येथे आयोजित विधी साक्षरता महाशिबीर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले. अखिल भारतीय विधी जागरूकता संपर्क अभियानांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली आणि दि सांगली बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मिरज तालुक्यातील मालगाव येथे विधी साक्षरता महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या महशिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व पालक न्यायमूर्ती सांगली न्यायिक जिल्हा न्यायमूर्ती अभय आहुजा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगलीचे अध्यक्ष अजेय राजंदेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रवीण नरडेले, भारती विद्यापीठाच्या लॉ कॉलेजच्या प्राचार्य पूजा नरवाडकर, जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती यांच्यासह सांगली बार असोसिएशनचे पदाधिकारी, विधीज्ञ व मालगाव व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. न्यायमूर्ती श्री. कोतवाल म्हणाले, संविधानाने दिलेले हक्क, कर्तव्य याची प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी विधी साक्षरतासारखी शिबीरे आयोजित करण्यात येत आहेत. या शिबीरांच्या माध्यमातून तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडील तज्ज्ञ विधींज्ञांमार्फत सर्वसामान्यांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन केले जात आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. न्यायपालिकेबाबत सर्वसामान्यांच्या मनात अनाठायी भिती आहे. मात्र न्यायपालिका या केवळ कायद्याचे पालन करुन आपले कर्तव्य बजावून लोकांना मदत करण्याची भूमिका पार पाडत असल्याने न्यायपालिकांबाबत भिती बाळगू नये. विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रत्येक गावात विधी साक्षरता विषयक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न आहे, याचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायमूर्ती श्री. कोतवाल यांनी केले. कायदे विषयक महाशिबीर कार्यक्रमास उपस्थित राहताना मालगावकरांनी केलेले स्वागत अविस्मरणीय आहे. आपण सांगली जिल्ह्याचा पालक न्यायमुर्ती असल्याने या विभागात सांगली जिल्ह्याचे असलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही न्यायमूर्ती श्री. कोतवाल यांनी यावेळी बोलतांना दिली. न्यायमूर्ती श्री. आहुजा म्हणाले, न्यायाचे चाक नेहमी पुढे जात रहावे या उक्ती प्रमाणे न्यायपालिका काम करीत आहे. सामान्यांच्या हक्काचे रक्षण व वंचिताना न्याय मिळवून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत अनेक कायदेविषयक मागदर्शन व शिबीरे आयोजित केली जात आहेत. यातून लोकांना त्यांचे हक्क, कर्तव्य व कायद्याबाबतची माहिती मिळेल. विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करुन विधी सेवा प्राधिकरणाच्या कामकाजाची माहिती न्यायमूर्ती आहुजा यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, सर्व सामान्यांमध्ये विधी साक्षरता व कायदेविषयक जनजागृती करणे हा मुख्य उद्देश ठेवून विधी सेवा प्राधिकरणामार्फत राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, कायदे विषयक शिबीरे आयोजित केली जात आहेत. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विधी साक्षरता महाशिबीरातून लोकांना न्याय व्यवस्था, विधी प्राधिकरणाबाबत मोफत मार्गदर्शन सल्ला या बाबत माहिती मिळत आहे. ग्रामीण भागातील लोकांसाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत. न्याय, विधी आणि प्रशासन एकत्र काम करत असल्याने याचा लाभ सामान्य जनतेला होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डुडी यांनी यावेळी सांगितले. विधी साक्षरतेमध्ये सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांचाही सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पोलीस अधीक्षक डॉ. तेली म्हणाले, गुन्हे घडण्याच्या प्रकारात वेगाने बदल होत आहेत. सद्या सायबर गुन्हे व आर्थिक फसवणूकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांना बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने यातील कायदेविषयक बाबींची माहिती सर्वांनी करुन घेणे गरजेचे आहे. प्राचार्य श्रीमती नरवाडकर यांनी घटनेने दिलेले मूलभूत हक्क व कर्तव्य याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश श्री. राजंदेकर यांनी प्रस्ताविकात जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण नरडेले यांनी आभार मानले. 0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा