बुधवार, १९ मे, २०२१

कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून केली पाहणी

सांगली दि. 19 ( जि.मा.का) : कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेज ॲन्ड हॉस्पीटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी समिर शिंगटे, तहसिलदार बी. जे. गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील, गटविकास अधिकारी रविंद्र कणसे, कवठेमहांकाळ उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक सतिश गडदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, नुतन होमिओपॅथीक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाजीराव शिंदे, डॉ. संदीप पाटील आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सुरूवातीस या हॉस्पीटलमध्ये 25 ऑक्सिजनेटेड बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथील डॉक्टरांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हॉस्पीटल चालविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ऑक्सिजन, औषधे आदि आवश्यक साधन सामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, औषधे, आरटीपीसीआर टेस्टींग, जैविक कचरा विल्हेवाट आदिंबाबत सविस्तर माहिती घेतली व हॉस्पीटलमध्ये पुरविण्यात आलेल्या सोयी सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडून तालुक्यातील रूग्णस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुची यांच्यावतीने कवठेमहांकाळ तालुक्यातील उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर्स व कर्मचारी तसेच आशा वर्कर्स यांना मोफत पीपीई किट, मास्क, सॅनिटायझर, ग्लोव्हज, ऑक्सिमिटर, फेसशिल्ड आदि कोविड साहित्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने हॉस्पीटलच्या परिसरात सुरू केलेल्या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भेट देवून पाहणी केली व त्यांचे कौतुक केले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा