शुक्रवार, २१ मे, २०२१

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी पोस्ट विभागाची बँकिंग सुविधा

सांगली दि. 21 (जि.मा.का.) : संचारबंदीमुळे बऱ्याच नागरिकांची बँक खात्यावर पैसे भरणे अथवा काढणे यासारख्या आवश्यक सेवा उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होते. तसेच या व्यवहारांसाठी संबंधित नागरिकाने प्रवास केला अथवा बँकेमध्ये गर्दी केल्यास त्याच्या स्वत:च्या आणि पर्यायाने त्याचे कुटुंब आणि ग्रामस्थ यांना कोरोना प्रसाराचा धोका निर्माण होऊ शकतो. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिसेसच्या विविध सुविधांचा वापर केल्यास बँकांमध्ये होणारी गर्दी कमी होवून कोरोना संसर्ग होण्याचा आणि प्रसाराचा धोका टळेल. नागरिकांनी पोस्ट विभागाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी केले आहे. शासकीय मदत निधी उदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, एकदा बँक खात्यावर वर्ग झाल्यास ते काढण्यासाठी बँकामध्ये प्रचंड गर्दी होण्याची संभव निर्माण होतो. जे सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत धोकादायक आहे. पोस्ट ऑफिसेसची सुविधा बहुतेक सर्व ग्रामीण भागात उपलब्ध आहे. AEPS या सुविधेचा वापर करुन गावातील नागरिक त्यांच्या इतर बँक खात्यामधील रक्कम काढू शकतात. तसेच डायरेक्ट मनी ट्रान्सफर (DMT) या सेवेचा वापर करुन इतर बँक खात्यावर पैसे भरण्याची सुविधाही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. AEPS सुविधेमध्ये इतर कोणत्याही बँक खात्यामधून पैसे काढण्याची सुविधा (जिल्हा मध्यवर्ती बँक/स्थानिक सहकारी बँक सोडून) आहे. त्यासाठी बँक खात्याला आधार सीडींग आवश्यक असून एकावेळेस जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढता येतात. एका दिवसात व्यवहाराची आणि रक्कमेची कमाल मर्यादा बँक नुसार बदलते. या सुविधेसाठी कोणत्याही प्रकारचे जादाचे शुक्ल आकारले जाणार नाहीत. आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. DMT सुविधेमध्ये इतर कोणत्याही आणि कोणाच्याही बँक खात्यावर पैसे भरता येतात. KYC पुर्ण असेल तर एका वेळेस कमाल 25 हजार आणि KYC पुर्ण नसेल तर एका वेळेस कमाल 5 हजार रूपये भरण्याची सोय आहे. या सेवेसाठी व्यवहार रक्कमेच्या 1 टक्के किंपर 10 रुपये या पैकी जे जास्त आहे ती रक्कम शुल्क म्हणून आकारण्यात येईल. अधिक माहितीसाठी 0233-2324252 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगली आयपीपीबी शाखेचे शाखा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा