सोमवार, ३ मे, २०२१

कोरोना बाधीतांची संख्या जास्त असलेल्या गावात सक्तीने कडक जनता कर्फ्यू पाळा - पालकमंत्री जयंत पाटील

सांगली दि. 3 (जि.मा.का.) : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या गावात कोरोना बाधितांची संख्या जास्त आहे त्या गावात निर्बंध अधिक कडक करून जनता कर्फ्यूचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या. जत येथील पंचायत समिती सभागृहात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार विक्रम सावंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी जितेंद्र डुडी, प्रातांधिकारी प्रशांत आवटे, तहसिलदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बंडगर, गट विकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर आदि उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विनाकारण बाहेर फिरताना आढळल्यास रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करा. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स यांना दमदाटी केल्यास शासकीय कामात अडथळा या अनुषंगाने कडक कारवाई करा. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्यांनाही होम आयसोलेशन करा. तसेच सौम्य लक्षणे जाणवणाऱ्यांनीही होम आयसोलेशन व्हावे. चेक पोस्टच्या ठिकाणी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात बंदोबस्त कडक करावा. प्राथमिक आरोग्य केंद्रांना जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. ॲम्बुलन्स सेवा सुरळीत ठेवावी. व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करून घ्यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. खाजगी रूग्णालंयानी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच बील आकारणी करावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जी खाजगी रूग्णालये कोरोना रूग्णांकडून डिपॉझीट मागणी करत असतील त्यांचे ऑडीट करावे. औषधांचा पुरवठा पुरेसा प्रमाणात करावा. जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा कोटा 23 वरून 35 टन करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्सिजन उपलब्ध करून देवू. देशात 60 रेमडीसीवीअर उत्पादक असून लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. रेमडेसीवीअरचा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहिम चांगली राबविण्यात येत असून लसीकरणात सांगली जिल्हा सर्वात पुढे आहे. 18 ते 45 वयोगटातील तरूण वर्गाला मोफत लस देणार असून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करावे. जत तालुका आकाराने मोठा असून प्राथमिक आरोग्य केंद्रे सज्ज करावी. माडग्याळ येथे हॉस्पीटल सुरू करण्याची तातडीने कार्यवाही करावी. सांगली मुख्यालयापासून अंतर जास्त असल्याने रूग्णांना उपचार येथेच उपलब्ध करावा. जत तालुक्यात 63 गावे आहेत. ज्या गावात 15 पेक्षा जास्त रूग्ण आहेत त्या गावातील निर्बंध अधिक कडक करावेत. सक्तीने जनता कर्फ्यू लागू करा. कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा व त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर प्रसिध्द करावी. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना विविध शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाठवावे. गावातील शाळा निश्चित करून बाधितांना शाळेत ठेवावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. निर्बंधांचे कठोर पालन होण्यासाठी पोलीसानींही गस्त वाढवावी. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. तत्पूर्वी पालकमंत्री जयंत पाटील यांनी डफळापूर येथील कोविड केअर सेंटरचे उदघाटन करून तेथे असणाऱ्या विविध सोयी सुविधांची पहाणी केली. यावेळी त्यांनी रूग्णांना चांगल्या सुविधा देण्याची सूचना करून रूग्णांची योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा