बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख रूपये वितरण

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा यंत्रणा, राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांकडून एक लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाख रूपये पर्यंतचे अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत परत फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर उत्पादन प्रोत्साहन म्हणून व्याज सवलत देण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2019-20 ते सन 2021-22 पर्यंत जिल्ह्यातील एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 3 लाखांपर्यंत अल्पमुदती पीक कर्ज घेणाऱ्या आणि विहीत मुदतीत (प्रत्येक वर्षी 30 जूनपर्यंत अथवा शासनाने अपवादात्मक परिस्थितीत कर्ज परतफेडीस मुदत वाढ दिली असल्यास तो दिनांक) परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रूपयांपर्यंत 3 टक्के व 1 लाख रूपयांपेक्षा जास्त पण 3 लाखांपेक्षा कमी रकमेवर 1 टक्के वार्षिक दराने व्याजाची सवलत देण्यात येते. सन 2021-22 पासून 3 लाखापर्यंतच्या अल्पमुदती पीक कर्जास 3 टक्के प्रमाणे व्याज सवलत लागू करण्यात आली आहे. यासाठी तालुक्याचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडून वि.का.स. संस्था अथवा राष्ट्रीयीकृत/ग्रामीण/खाजगी बँकांच्या शाखांकडून पात्र सभासद शेतकऱ्यांचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांच्या कार्यालयास प्राप्त होतात. तद्नंतर सदर योजनेकरिता प्राप्त झालेल्या निधीतून कोषागाराकडून बील मंजूर झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर व्याज सवलतीची रक्कम जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत सन २०१९-२० ते सन २०२१-२२ पर्यंत वर्षनिहाय लाभ दिलेली शेतकरी संख्या व कंसात रक्कम पुढीलप्रमाणे. सन 2019-20 - 42 हजार 462 (6 कोटी 55 लाख 59 हजार 161 रूपये), सन 2020-21 - 21 हजार 557 (2 कोटी 99 लाख 88 हजार 155 रूपये), सन 2021-22 - 27 हजार 445 (4 कोटी 99 लाख 60 हजार 268 रूपये), अशा एकूण 91 हजार 464 शेतकऱ्यांना 14 कोटी 55 लाख 7 हजार 584 रूपये रक्कमेचा लाभ देण्यात आला आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा