बुधवार, २० मार्च, २०२४

निवडणूक अनुषंगाने आता एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळणार विविध परवाने

सांगली दि. 20 (जि.मा.का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामांकरिता विविध राजकीय पक्ष व उमेदवार यांना आचारसंहिता कालावधीत द्यावयाच्या विविध परवानग्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यास्तरावर आजपासून एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे. सांगली लोकसभा मतदार संघासाठी सदरचा कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सांगली (तळमजला ) येथे कार्यरत करण्यात आला आहे. तर त्या त्या तालुक्याच्या ठिकाणी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर ही एक खिडकी कक्षामधून परवाने देण्यात येतील. एकापेक्षा अधिक विधानसभा मतदार संघाकरिता वाहन परवाना, रॅली, मिरवणूक परवाना आदी बाबींचा यामध्ये समावेश राहणार आहे. सुविधा पोर्टलवर तसेच प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या अर्जाबाबत Encore पोर्टलच्या माध्यमातून परवानगी देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील 281-मिरज विधानसभा मतदार संघासाठी - पंचायत समिती मिरज, 282-सांगली - सांगली महानगरपालिका, 285 पलूस -कडेगाव - उपविभागीय कार्यालय कडेगाव, 286-खानापूर - तहसिल कार्यालय विटा, 287 - तासगाव - कवठे महांकाळ - प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय तासगाव व 288-जत विधानसभा मतदारसंघासाठी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय जत या ठिकाणी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदार संघाचा समावेश नाही. जाहीर /कॉर्नर सभा, मेळावे, मिरवणुका, रोड – शो, रॅलीज, वाहन परवाना इत्यादींच्या अनुषंगाने संबंधित राजकीय पक्षाच्या लेटर हेडवर त्या संबंधित राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा अर्ज व उमेदवार यांच्या बाबतीत उमेदवाराच्या स्वतःच्या सहीचा अर्ज किंवा उमेदवाराचा अधिकृत निवडणूक प्रतिनिधीच्या सहीचा अर्ज सदर कक्षामध्ये स. 10 ते सायं 5 या वेळेत सुट्टीच्या दिवशीही स्विकारण्यात येतील. मीटिंग, सभा, रॅली आदीच्या परवानगीसाठी किमान 2 दिवस अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच suvidha.gov.eci.in या पब्लिक पोर्टलवर ही अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असून विविध परवानगी देण्याच्या अनुषंगाने अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, फी आदीबाबत सविस्तर माहिती sangli.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा