मंगळवार, २४ जुलै, २०१८

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

सांगली, दि. 24, (जि. मा. का.) : शासनाने खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी सहभाग घेण्याची अंतिम मुदत 24 जुलै होती. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेवून त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्जदार शेतकऱ्याप्रमाणेच या योजनेत आता सहभागी होण्यासाठी 25 जुलै पासून 31 जुलै 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे यांनी दिली.
    राजेंद्र साबळे म्हणाले, अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. सांगली जिल्ह्याकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनामार्फत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
     प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2018 मध्ये राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर कंसात शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता अनुक्रमे पुढीलप्रमाणे. भात - 30 हजार रूपये (600 रू.), खरीप ज्वारी - 24 हजार रूपये (480 रू.), बाजरी - 20 हजार रूपये (400 रू.), मका - 26 हजार 200 रूपये (524 रू.), तूर - 25 हजार रूपये (500 रू.), मूग - 18 हजार रूपये (360 रू.), उडीद - 18 हजार रूपये (360 रू.), भुईमूग 30 हजार रूपये (600 रू.), सोयाबिन 40 हजार रूपये (800 रू.), कापूस - 35 हजार रूपये (1 हजार 750 रूपये).
    पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट, पीक पेरणीपूर्व / लावणीपूर्व नुकसान भरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे, काढणी पश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती या विमा संरक्षणाच्या बाबी आहेत. खरीप 2018 पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेस सादर करण्यावेळी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बँक खातेपुस्तकाची प्रत तसेच आधारकार्ड छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र / किसान क्रेडिटकार्ड/नरेगा जॉबकार्ड/वाहनचालक परवाना यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2018 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी त्वरीत बँकेशी संपर्क साधावा. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावे लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे अद्यापही आधार कार्ड र् नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरीत नजीकच्या आधार नोंदणी केंद्राशी संपर्क करून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा