मंगळवार, १० जुलै, २०१८

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणूक 2018 - कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज रहा - जिल्हाधिकारी वि. ना. काळम

कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्ज रहा
-         जिल्हाधिकारी वि. ना. काळम
कायदा सुव्यवस्थेची बैठक संपन्न

सांगली, दि. 10, (जि. मा. का.) : जिल्ह्यात होत असलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीेने आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सज्ज सतर्क राहावे. आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वि. ना. काळम यांनी आज आज दिल्या.
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आयोजित कायदा सुव्यवस्था बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, अतिरीक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, आचारसंहिता कक्ष प्रमुख डॉ. विकास खरात, उपायुक्त स्मृती पाटील, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग अन्य संबंधित यंत्रणांचे अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिका निवडणूक मुक्त, पारदर्शी आणि भयमुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करावे, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीसाठी 8 सदस्यीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यास आली आहे. आचारसंहिता कक्ष प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली 3 भरारी पथके आणि 8 भरारी उपपथके स्थापन करण्यात आली आहेत. त्याचबरोबर अवैध दारूबंदीसाठी चेक पोस्टवर 8 व्हिडिओ पथके ठेवण्यात आली आहेत. शस्त्रे, निवडणूक प्रचार साहित्य यांच्यावर नजर ठेवण्यासाटी नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी पडता  निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले. तसेच, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या.
    स्टॅटीक सर्व्हेलन्स टीम, बीडीओ सर्व्हेलन्स टीम, फ्लाईंग स्कॉड, पोलीस यंत्रणा यांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल यासाठी दक्ष रहावे, असे सांगून राज्य उत्पादन शुल्ककडील यंत्रणांनी निवडणुकीच्या काळात अधिक दक्ष रहावे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी  प्रबोधन करण्यात यावे. मतदान यंत्र सुस्थितीत असल्याबाबत तपासणी करावी आदि सूचना जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी यावेळी दिल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा म्हणाले, महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महानगरपालिका निवडणूक रंगीत तालीम आहे. त्यामुळे मुक्त, पारदर्शी आणि भयमुक्त रीतीने निवडणूक पार पाडण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य पार पाडावे. सर्व विभागांनी चोख नियोजन आणि समन्वय ठेवून आपली जबाबदारी पार पाडावी, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा