रविवार, १५ जुलै, २०१८

युवकांनी नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत - उप प्राचार्य के. के. दाभणे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी कृषि, आर्थिक नियोजन, संवाद कौशल्य, मार्केटिंग इत्यादी विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षण देवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. नवनवीन क्षेत्रे निर्माण होत असून युवकांनी नव्या वाटा शोधाव्यात नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उप प्राचार्य के. के. दाभणे यांनी केले.
    जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त लियाड  इन्स्टिट्युट ऑर्फ आर्ट ऍ़ण्ड डिझाइन, सांगली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस. के. माळी, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी ए. बी. तांबोळी, लियाड  इन्स्टिट्युट ऑर्फ आर्ट ऍ़ण्ड डिझाइन प्रशिक्षण संस्थेचे संचालक साहील शहा तसेच विविध प्रशिक्षण संस्थेचे संचालक उपस्थित होते.
    उप प्राचार्य के. के. दाभणे म्हणाले, प्रशिक्षण संस्थांनी युवकांमध्ये स्वत:च्या पायावर उभा राहण्याची क्षमता निर्माण करावी. शासनाबरोबरच वेगवेगळ्या संस्थांनी पुढे येऊन युवकांना उत्तम दर्जाचे प्रशिक्षण देवून विकासाचे काम करावे.  युवकांनी नोकरी मागण्यापेक्षा विविध उद्योग उभारून नोकरी देणारे व्हावे. प्रत्येक घटकातील गरज ओळखून कौशल्य आत्मसात करावे. जीवनात सहकार्याशिवाय पुढे जावू शकत नाही यासाठी एकमेकंाना सहकार्य करावे समाजाला मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
    प्रास्ताविकात सहाय्यक संचालक एस. के. माळी यांनी जागतिक कौशल्य दिनाचा हेतू सांगून युवकांनी विविध प्रशिक्षण संस्थाव्दारे चांगले कौशल्य आत्मसात करून याचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. तसेच कृषि क्षेत्रात मोठा वाव असून प्रशिक्षण संस्थांनी कृषि विषयक प्रशिक्षण कोर्सेस सुरू करावेत. मार्केटिंग क्षेत्राची गरज ओळखून प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम तयार करावा. त्याचबरोबर संवाद कौशल्यही चांगले असावयास हवे असे सांगून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेची माहिती दिली जागतिक कौशल्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
     यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणाऱ्या कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची विविध निकषाव्दारे निवड करून मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक प्राप्त इज्युब्रीज लर्निंग प्रा.लि. सांगली, व्दितीय क्रमांक प्राप्त शत्रुंजय इन्स्टिट्युट सांगली, तृतीय क्रमांक प्राप्त गुरूकुल कंम्प्युटर मिरज तसेच इश्वरी इन्स्टिट्युट ऑफ इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी सांगली लियाड इन्स्टिट्युट ऑफ आर्ट ऍ़ण्ड डिझाइन सांगली या प्रशिक्षण संस्थांना प्रोत्साहनात्मक स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
    शत्रुंजय इन्स्टिट्युटचे संचालक स्वप्नील शहा गुरूकूल कंम्प्युटर इन्स्टिट्युटचे संचालक कयुम यरगट्टी यांनी मनोगत व्यक्त करून प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन महादेव माळी यांनी केले. आभार ए. बी. तांबोळी यांनी मानले.
    यावेळी विविध प्रशिक्षण संस्थाचे संचालक, प्रतिनिधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे व्ही. ए. काळे, ग. रा. बडक, संतोष कोष्टी, पंकज कांबळे, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा