शनिवार, २१ जुलै, २०१८

लोकराज्य 'वारी' विशेषांकाचे जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते प्रकाशन

सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे अतिथी संपादक असलेल्या लोकराज्यच्या 'वारी' या ऑगस्ट महिन्याच्या विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी (महसूल) विजया यादव, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, माहिती अधिकारी संप्रदा बीडकर आदि उपस्थित होते.
    पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या आषाढी वारीचे औचित्य साधून माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने 'वारी' हा लोकराज्य विशेषांक प्रकाशित केला आहे. या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'रंगले हे चित्त माझे विठुपायी' असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. माहिती जनसंपर्क विभागाचे महासंचालक तथा लोकराज्यचे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या लोकराज्य वारी विशेषांकात श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदि मान्यवरांनी वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. तसेच जयंत साळगांवकर यांचा लेख पुर्नमुद्रित केला आहे. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
    आषाढी वारीच्या निमित्ताने माहिती जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेला वारी विशेषांक वाचनीय आणि संग्राह्य आहे. तो प्रत्येकाने वाचावा, संग्रही ठेवावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी वारी विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी केले. जिल्ह्यातील अंक विक्रेत्याकडे लोकराज्य वारी विशेषांक वाचकांसाठी उपलब्ध असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी सांगितले. या विशेषांकाची किंमत दहा रूपये आहे.
00000



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा