सोमवार, १६ जुलै, २०१८

आंतरजातीय विवाह आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत 515 लाभार्थींना अडीच कोटीहून अधिक अर्थसहाय्य

सांगली, दि. 16, (जि. मा. का.) : राज्यातील जातीय भेदाभेद कमी करण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्यांना आंतरजातीय विवाहास प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यात सन 2013-14 ते सन 2017-18 पर्यंत एकूण 515 लाभार्थींना 2 कोटी 52 लाख 25 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी ही माहिती दिली.
    राधाकिसन देवढे म्हणाले, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू, जैन, लिंगायत, बौध्द, शीख या पैकी दुसरी व्यक्ती अशांनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील विवाहित जोडप्यांना या योजनेंतर्गत 50 हजार रूपये अर्थसहाय्य देण्यात येते. हा धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येतो.
   या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन 2013-14 मध्ये एकूण 84 लाभार्थींना 41 लाख 65 हजार रूपये, सन 2014-15 मध्ये एकूण 86 लाभार्थींना 41 लाख 60 हजार रूपये, सन 2015-16 मध्ये एकूण 132 लाभार्थींना 65 लाख 30 हजार रूपये, सन 2016-17 मध्ये एकूण 90 लाभार्थींना 431 लाख 95 हजार रूपये तर सन 2017-18 मध्ये एकूण 123 लाभार्थींना 59 लाख 75 हजार रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा