सोमवार, ९ जानेवारी, २०२३

सांगलीत कनोईंग व कयाकिंगच्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रासाठी आवश्यकती सर्व मदत करणार - पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सांगलीत सुरु सांगली दि. 9 (जि.मा.का.) : कनोईंग व कयाकिंग या क्रीडा प्रकारासाठी सांगली येथे उत्तम दर्जाची सोय होण्याबरोबर खेळाडूंना चांगले मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. यासाठी सांगली येथे कनोईंग व कयाकिंग या क्रीडा प्रकारासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र होण्यासाठी शासनस्तरावरुन आवश्यकती सर्व मदत व पाठपुरावा केला जाईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज केले. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनद्वारा शिवछत्रपती क्रीडापीठ, बालेवाडी पुणे येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा- 2022-2023 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील कनोईंग व कयाकिंग स्पर्धा सांगली येथे होत असून या स्पर्धेचे उद्घाटन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, माजी आमदार दिनकर पाटील, भारतीय कनोईंग व कयाकिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. भगवानसिंग वनोरे, महाराष्ट्र असो. फॉर कनोईंग कयाकिंगचे अध्यक्ष समीर मुणगेर, टेक्निकल ऑफिसर पी. रामकृष्णन, हेमंत पाटील यांच्यासह स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक व क्रीडा प्रेमी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. खाडे म्हणाले, राज्यातील खेळाडूंना आपला खेळ दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करता यावा, ऑलिम्पिकमध्ये राज्याच्या खेळाडूंनी प्रतिनिधीत्व करावे यासाठी अशा क्रीडा स्पर्धा महत्वाच्या आहेत. महाराष्ट्र राज्याने खेळाडूंना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून उत्तोमोत्तम खेळाडू घडतील, असा विश्वास पालकमंत्री श्री. खाडे यांनी व्यक्त करुन स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या श्री. वनोर म्हणाले, महाराष्ट्र राज्याने खेळाडूंसाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करुन क्रीडा विश्वात एक नवीन पायंडा सुरु केला आहे. या स्पर्धेतून अनेक खेळाडू तयार होऊन ते देश व आंतराष्ट्रीय पातळीवर आपला वेगळा ठसा निर्माण करतील. महाराष्ट्र राज्याने सुरु केलेल्या या स्पर्धेचे देशातील अन्य राज्यांनी अनुकरण करणे आवश्यक आहे. सांगलीत कृष्णा नदीमध्ये कनोईंग व कयाकिंग स्पर्धेसाठी पोषक वातावरण आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण केंद्र सुरु होणे गरजचे आहे. महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याबाबत पुढाकार घेतल्यास भारतीय कनोईंग व कयाकिंग फेडरेशन आवश्यक मदत करेल, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच खेळ व क्रीडाच्या विकासासाठी प्रत्येक गावात क्रीडा महाकुंभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जल स्पर्धेसाठी सांगली येथील कृष्णा नदीचे पात्र चांगले आहे. अशा स्पर्धेतून जिल्ह्यात या क्रीडा प्रकारचा विकास होईल, अशी अपेक्षा माजी आमदार दिनकर पाटील व्यक्त केली. जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. खेळाडूंना अधिक संधी व प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्य शासनाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंना सर्व सुविधा पुरविण्यात येत असून कमी वेळेत स्पर्धेची तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. कनोईंग व कयाकिंग या दोन्ही जलक्रीडा स्पर्धा 1000 मीटर, 500 मीटर आणि 200 मीटर इतक्या अंतराच्या होणार आहेत. दोन्ही प्रकारामध्ये सिंगल, डबल आणि फोर या प्रकारात मुलांच्या व मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंची निवड होऊन 77 मुले व 33 मुली स्पर्धेसाठी पात्र ठरली आहेत. 27 व्यवस्थापक व मार्गदर्शक आणि 35 अधिकारी आणि पंच स्पर्धेचे कामकाज पाहणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा