शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक : उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 13 (जि. मा. का.) : ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या ज्या उमेदवारांनी अद्यापी खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही, अशा उमेदवारांनी 20 जानेवारी 2023 पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयात विहित नमुना तसेच प्रतिज्ञा पत्रासह खर्चाचा हिशोब सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ब) 1 नुसार निवडणुकीचा निकाल लागल्यापासून 30 दिवसाच्या आत उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर करण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या ४४७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवलेल्या 10 हजार 107 उमेदवारांपैकी 2 हजार 907 उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केलेला आहे. उर्वरित 7 हजार 200 उमेदवारांनी अध्यापी खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 14 (ब) नुसार विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास उमेदवारांना निवडणूक लढविण्यास निरर्ह करण्याची तरतूद आहे. खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार असल्याने, ज्या उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे तसेच ज्यांची बिनविरोध निवड झाली आहे, अशा सर्व उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब तातडीने सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा