बुधवार, ४ जानेवारी, २०२३

बांबवडे - टाकवे भागात बिबट वन्यप्राण्याचा वावर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

सांगली, दि. 4, (जि. मा. का.) : शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे बिबट वन्यप्राण्यांची तीन पिल्ले आढळून आल्याने मौजे बांबवडे - टाकवे भागात बिबट वन्यप्राण्याचा वावर असल्याने परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांनी केले आहे. शिराळा तालुक्यातील बांबवडे येथे बिबट वन्यप्राण्यांची 3 पिल्ली आढळून आल्याची माहिती बांबवडे येथील भानुदास यशवंत माने यांच्याकडून वनपरिक्षेत्र शिराळा कार्यालयास दुरध्वनीव्दारे दि. 3 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजता मिळाली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वनपाल बिळाशी चंद्रकांत देशमुख, वनरक्षक खुजगांव कु. देवकी ताशिलदार, वनरक्षक बिळाशी प्रकाश पाटील व अधिनस्थ कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर ठिकाणी टाकवे येथील सुनिल शिवाजी राऊत यांच्या मा.स.नं. 536 मध्ये ऊसतोड चालू असताना बिबट वन्यप्राण्याची नर - 2 व मादी 1 अशी एकुण 3 पिल्ली आढळून आली. या पिलांची शिराळा पशुवैद्यकिय अधिकारी सतिशकुमार जाधव व शुभांगी अरगडे, यांच्यामार्फत तपासणी केली असता ती सुस्थितीत असल्याने त्यांना सुरक्षितरित्या त्याच शेतात ठेवून त्यांची देखभाल व काळजी घेतली. पिल्यांचे बचावकार्य उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, व सहा. वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या करण्यात आले आहे. तदनंतर सायंकाळी सदरच्या शेतात घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावून तीनही पिल्ली सुस्थितीत ठेवण्यात आली. काही वेळानंतर सदर पिलांची आई (मादी) घटनास्थळी येवून तीनही पिल्ली घेवून नैसर्गिक अधिवासात गेली. या घटनेचे व्हिडीओ कॅमेरामध्ये ट्रॅप झाले आहेत. या कामी बांबवडे गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे वनक्षेत्रपाल महंतेश बगले यांनी कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा