बुधवार, २५ जानेवारी, २०२३

मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 25 (जि.मा.का.) :- मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईल प्रणाली सुरु करण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले आपल्या अँडरॉईड मोबाईलव्दारे घरबसल्या ऑनलाईन प्रणालीव्दारे मतदार नोंदणी करू शकतात. मतदार नोंदणीसाठी युवकांनी ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृतीसाठी स्टेशन चौक सांगली येथून सायकल रॅली व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी एम. बी. बोरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, सांगली अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी शिल्पा ओसवाल आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदान करण्याचा हक्क मिळतो. मतदार नोंदणीसाठी आपल्या अँडरॉईड मोबाईलवर Voter Helpline App डाऊनलोड करून त्यावर फॉर्म नं. 6 भरून व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सबमिट केल्यानंतर आपणास आपोआप मतदार ओळखपत्र मिळते. तसेच nvsp.in या वेबसाईटवरही फॉर्म नं 6 भरून मतदार नोंदणी करू शकतो. या शिवाय प्रत्यक्ष तहसिल कार्यालयामध्ये जावूनही मतदार नोंदणी करता येते. जिल्ह्यात 18 ते 19 वर्षे वयोगटातील जवळपास 80 हजार युवक आहेत. यामधील फक्त 26 टक्के लोकांनी मतदार नोंदणी केलेली आहे. ज्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही त्यांनी ती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. प्रारंभी मतदार जागृतीवर पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ देवून सायकल रॅली व प्रभात फेरीस हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅली व प्रभात फेरीची सुरूवात करण्यात आली. सायकल रॅली स्टेशन चौकापासून राम मंदिर मार्गे पुष्कराज चौक ते परत स्टेशन चौक अशी काढण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक अपर तहसिलदार डॉ. अर्चना पाटील यांनी केले. या कार्यक्रमात एनसीसी व एनएसएस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, चंपाबेन वालचंद शहा, कस्तुरबाई वालचंद कॉलेज, गणपतराव आरवाडे हायस्कूल, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली आदि शाळा महाविद्यालयातील विद्याथी, प्राध्यापक, शिक्षक, निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा