बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

व्याजपरतावा योजनेतून फुलला इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांचा व्यवसाय

मनात इच्छा ठेवली तर काहीही होऊ शकते. सर्व अडथळ्यांची शर्यत पार करता येते. इस्लामपूरच्या भाग्यश्री पाटील यांनी हे सिद्ध केले आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. वर्षभरातच त्यांच्या सॉक्स आणि शूजनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. भाग्यश्री मनोज पाटील या अभियांत्रिकी पदवीधर आहेत. कुटुंबात त्यांच्यासह सासू, सासरे, पती, २ मुले इतके सदस्य आहेत. २०१० सालापर्यंत भाग्यश्री आणि मनोज पाटील हे दोघेही अभियंता क्षेत्रात पुणे येथे नोकरी करत होते. कौटुंबिक कारणास्तव त्यांना इस्लामपूर येथे मूळ गावी परतावे लागले. पण, दोघांचीही नोकरीऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्याची जबरदस्त इच्छा होती. त्यातून भाग्यश्री यांच्या साथीने प्रारंभी पती मनोज पाटील यांनी भागिदारीमध्ये स्वतःचा व्यवसाय केला. त्यामध्ये जम बसल्यानंतर त्याचीच स्वतंत्र शाखा सुरू करण्याचा मनोदय भाग्यश्री यांनी व्यक्त केला. त्याला मनोज पाटील यांनी लगेचच प्रोत्साहन दिले. त्यातून भाग्यश्री यांनी धनंजय एंटरप्रायझेज या नावाची फर्म सुरू केली. निक्स (knics) ब्रँडने त्या शूज आणि सॉक्सची निर्मिती करतात. याबाबत भाग्यश्री पाटील म्हणाल्या, आमच्या धनंजय एंटरप्राइजेस या फर्ममधून सॉक्स अँड शूज तयार केले जातात. त्यासाठी मला आयडीबीआय बँकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळाले. कर्ज मिळाल्यानंतर मी व्याजपरतावा योजनेसाठी महामंडळाकडे रीतसर अर्ज केला. प्रोजेक्ट रिपोर्ट व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे महामंडळाकडे जमा केल्यानंतर मला गेले वर्षभरापासून कर्जाचे व्याज नियमितपणे परत मिळत आहे. आजअखेर जवळपास 76 हजार रूपये व्याजपरतावा मिळाला आहे. व्याजपरतावा वेळेत मिळत असल्यामुळे पुढील हप्ता वेळेत भरणे अतिशय सोयीस्कर होत आहे. व्याजपरतावा नियमित होत असल्याने निश्चिंत राहून व्यवसायात प्रगती करू शकत आहे. सध्या माझ्याकडे मॅन्युफॅक्चरिंगसठी चार मशीन्स आहेत. प्रॉडक्शन मॅनेजरसह फर्ममध्ये ५ लोकांचा स्टाफ आहे. महिला, पुरूष, बालके यासह मागणीप्रमाणे कस्टमाईज्ड सॉक्सची निर्मिती आमच्या कंपनीत केली जाते. त्यासाठी लागणारा कच्चा माल मुंबई, इचलकरंजी, दिल्ली येथून खरेदी केला जातो. आमच्या कंपनीची उत्पादने विक्रीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये जातात. उद्योग उभारणीसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बळ मिळाले. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील लोकांच्या व्यवसायाला गती मिळत आहे. यासाठी त्या महामंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतात. - संप्रदा बीडकर जिल्हा माहिती अधिकारी, सांगली 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा