शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सारथीचे बळ

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र कोल्हापूर मार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. सारथी मार्फत देण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ घेऊन विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत. याबद्दल थोडक्यात माहिती. महाराणी ताराराणी स्पर्धा परीक्षा विभाग केंद्रीय लोकसेवा आयोग - या उपक्रमांतर्गत सारथी मार्फत UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य तसेच मुलाखत या तीनही टप्प्यावर विद्यार्थ्यांना तयारीसाठी प्रशिक्षण सहाय्य करण्यात येते. यासाठी महाराणी ताराबाई स्पर्धा परीक्षा विभाग सक्रियरित्या कृतीशील असून या उपक्रमांतर्गत UPSC च्या पूर्व परीक्षेसाठी 500 विद्यार्थी दरवर्षी निवडण्यात येतात. नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरमहा 13 हजार रूपये व पुणे येथील विद्यार्थ्यांना दरमहा 9 हजार रूपये विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथी मार्फत भरण्यात येते. केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा : आतापर्यंत मागील तीन वर्षात 2020, 2021, 2022 मध्ये एकूण 1 हजार 479 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी रुपये 21 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा : आतापर्यंत UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 50 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 650 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 3 कोटी 25 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत: मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 25 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 206 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 51 लाख रूपये इतका निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. सारथी अंतर्गत UPSC परीक्षेमध्ये मागील तीन वर्षात IAS परीक्षेमध्ये 12, IPS परीक्षेमध्ये 18, IRS परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी उतीर्ण झाले असून इतर केंद्रीय सेवांमध्ये एकूण 12 अशा एकूण 51 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तर भारतीय वन सेवेसाठी 2 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच UPSC CAPF सेवेसाठी 5 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील अजिंक्य बाबुराव माने या विद्यार्थ्याची UPSC मधील नागरी सेवेमध्ये निवड झालेली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सन 2022-23 मध्ये सांगली जिल्ह्यातील 3 विद्यार्थ्यांना एकूण 75 हजार रूपये अर्थसहाय्य केले आहे. तर केंद्रीय लोकसेवा आयोग(मुख्य परीक्षा) टप्प्यावर 6 विद्यार्थ्यांना एकूण 3 लाख रूपये अर्थसहाय्य केले आहे. महाराष्ट्र राज्यसेवा आयोग - UPSC प्रमाणेच राज्यसेवा परीक्षा MPSC मध्ये ही सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, कोंचिंग सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. MPSC साठी 750 विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी करण्यात येते. यासाठी पुणे येथे विद्यार्थ्यांना दरमहा 8 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षण संस्थेचे शुल्क सारथीमार्फत भरण्यात येते. MPSC पूर्व परीक्षा - आतापर्यंत मागील तीन वर्षात 1 हजार 125 विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेसाठी 8 कोटी 26 लाख रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. MPSC मुख्य परीक्षा - मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 15 हजार रूपये एकरकमी अर्थ सहाय्य म्हणून दिले जाते. आत्तापर्यंत मागील तीन वर्षात एकूण 7 हजार 367 विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी 11 कोटी निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. MPSC मुलाखत - मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी 10 हजार रूपये एकरकमी दिले जातात. मागील तीन वर्षात 566 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी रुपये 56 लाख 60 हजार रूपये निधी लाभार्थी विद्यार्थ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आलेला आहे. सन 2021-22 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र कृषी सेवा, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, वन सेवा, यांत्रिकी सेवा, न्यायालयीन सेवा –दिवाणी न्यायाधीश परीक्षा (CJJD –JMFC) इत्यादी परीक्षांच्या मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रती विद्यार्थी दहा हजार रुपये इतकी रक्कम एकवेळचे अर्थ सहाय्य म्हणून देण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुलाखत टप्प्यावर सांगली जिल्ह्यातील 44 विद्यार्थ्यांना 4 लाख 40 हजार रूपये तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा टप्प्यावरील 368 विद्यार्थ्यांना 55 लाख 20 हजार रूपये अर्थसहाय्य करण्यात आले. MPSC राज्य सेवा 2020 मध्ये निवड झालेले सांगली जिल्ह्यातील विद्यार्थी - तन्वीर संपतराव पाटील ता. शिराळा, निखिल सुरेश पाटील ता. वाळवा, अर्जुन संजय कदम ता. खानापूर, सतीश रामहरी चव्हाण ता. आटपाडी, संग्राम अरुण पाटील ता. तासगाव, शुभम सुधीर जाधव ता. खानापूर, ऋतुजा हिम्मतराव शिंदे ता. कडेगाव. छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (CSMNRF) - या योजनेंतर्गत सारथीमार्फत लक्षित गटातील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे/विकसित करण्यासाठी संशोधन पूर्ण होईपर्यंत परंतू कमाल 5 वर्षाच्या कालावधीकरिता संशोधन प्रगती अहवालाच्या आधारे JRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 31 हजार रूपये अधिछात्रवृती व SRE साठी प्रति विद्यार्थी प्रतिमहा 35 हजार रूपये अधिछात्रवृती देण्यात येते. तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो. सन 2019 ते 2023 या कालावधीत एकूण 2 हजार 109 विद्यार्थांचा सहभाग आहे. तर 2 हजार 109 विद्यार्थांना फेलोशिपसाठी एकूण 42 कोटी 33 लाख 36 हजार, घरभाडे भत्त्यासाठी 2 कोटी 36 लाख 50 हजार व आकस्मिक खर्चासाठी 40 लाख 7 हजार निधी वितरित करण्यात आलेला आहे. यामध्ये सन 2019 मध्ये मुख्यमंत्री विशेष संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सांगली जिल्ह्यातील 14 विद्यार्थ्यांना तर छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती योजनेंतर्गत सन 2019 ते 2022 पर्यंत एकूण 58 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, सांगली 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा