गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३

आटपाडी तालुक्यामधील दुध संकलन केंद्रांची तपासणी विना परवाना व्यवसाय करणाऱ्या पेढीस व्यवसाय बंद करण्याचे निर्देश

सांगली, दि. 14 (जि. मा. का.) : आटपाडी तालुक्यामधील दुध संकलन केंद्रांची तपासणी आज अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) गुप्तवार्ता श्री. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकामध्ये सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामधील प्रत्येकी 4 व सातारा जिल्ह्यामधून एक अन्न सुरक्षा अधिकारी यांचा तसेच जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांचा समावेश होता. या पथकाकडून आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील श्री श्याम दुग्धालय, श्री श्याम दुग्धालय ( दुध शितकरण केंद्र), सिद्धनाथ दुध संकलन केंद्र व आशिष दुध संकलन केंद्र, या दुध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली. या दुध संकलन केंद्रामधून गाय व म्हैस दुधाचे नमुने विश्लेषणाकरीता घेण्यात आले. तपासणी दरम्यान श्याम दुग्धालय (दुध शितकरण केंद्र) ही पेढी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे आढळल्याने या पेढीस विना परवाना व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. दुध भेसळीबाबत कारवाई करीता शासनाने गठीत केलेल्या समितीकडून मागील एक महिन्यामध्ये 83 दुध संकलन केंद्रांची तपासणी करण्यात आली असून 7 नमुने घेण्यात आले आहेत व 172 कि. ग्रॅ. खव्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पुढील कालावधीमध्ये सुद्धा सातत्याने सुरु राहणार आहे. नागरीकांनी दूध भेसळीबाबत कोणतीही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या fdasangli@gmail.com या ईमेल वरती तक्रार करावी किंवा माहिती द्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा