सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

हणमंत सूर्यवंशी यांना शेततळे अस्तरीकरणामुळे लाभ

सांगली, दि. 11 (जि. मा. का.) - तासगाव तालुक्यातील हणमंत सूर्यवंशी यांना लहरी पावसामुळे शेती करण्यात मर्यादा येत होत्या. शेततळ्यातून त्यांनी त्यावर मात केली आहे. श्री. सूर्यवंशी यांच्या कुटुंबात त्यांच्यासह आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे 5 सदस्य आहेत. शेततळे अस्तरीकरणामुळे त्यांच्या उत्पन्नात लाखाची वाढ झाली आहे. हणमंत गुंडा सूर्यवंशी यांची मणेराजुरी जवळील योगेवाडी येथे दीड एकर शेती आहे. मात्र, शेतीला पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावयाचा. पावसाळ्यात खरीप हंगामात हायब्रीड ज्वारीचे पीक ते घ्यायचे. मात्र, उन्हाळ्यात हाती काहीच लागायचं नाही. त्यांनी तीन ते चार वेळा बोअरवेल मारण्याचा प्रयत्न केला. पण, पाणी लागले नाही, त्यामुळे त्यांची निराशा झाली. शेती असूनही ते पूर्ण वेळ शेती करू शकत नव्हते. त्यांनी इतर वेळी गवंडी काम करण्याचा पर्याय स्वीकारला. त्यातून येणाऱ्या तुटपुंज्या पैशात त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. त्यातच सहा महिन्यांपूर्वी त्यांचा अपघात झाल्याने ते गवंडी कामही करू शकत नव्हते. याबाबत श्री. सूर्यवंशी म्हणाले, अनिश्चित पाऊसमान, दुष्काळी परिस्थिती अशा सर्वच शेतकऱ्यांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या मलाही होत्याच. अशा परिस्थितीत मी शेती करत होतो. त्यातच, अपघात झाल्यामुळे गवंडी कामही करता येणार नव्हते. त्यामुळे माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला. पण, या बिकट परिस्थितीत कृषि विभागाचे अधिकारी व कृषि मित्र यांनी मला शेततळे अस्तरीकरणाची माहिती दिली. 30 मीटर बाय 30 मीटर शेततळे खुदाई व अस्तरीकरणासाठी मला ८८ हजार रूपये खर्च आला. कृषि विभागाकडे अर्ज केल्यानंतर एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण बाबीसाठी मला रक्कम ४१ हजार २१८ रूपये अनुदान मिळाले. शेततळे अस्तरीकरण केल्यानंतर इतर ठिकाणहून पाणी घेऊन ते पाणी शेततळ्यात साठवले आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे शेती कशी करायची असा प्रश्न मला पडला नाही. शेततळे केल्यानंतर उन्हाळा असूनही मी चारा वैरणीचे पीक घेतले. शेततळ्यातील पाण्यातून मी आता भाजीपाला, शेंगा, मिरची यांचे पिक घेत आहे. यामुळे उत्पन्नात एक लाख १० हजार रूपयांची वाढ झाल्याची श्री. सूर्यवंशी सांगतात. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा