बुधवार, १७ जानेवारी, २०२४

वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेच्या कर्जदारांना एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेचा 26 फेब्रुवारी पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 17 (जि.मा.का.) : वसंतदादा शेतकरी सहकारी बँक लि., सांगली (अवसायनात) या बँकेच्या सर्व कर्जदार, जामिनदार यांना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या दि. 28 जून 2023 रोजीच्या मंजुरीने एकरक्कमी कर्ज परतफेड योजना लागू झालेली आहे. या व्याज सवलत योजनेचा सर्व कर्जदार खातेदारांनी दि. 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत लाभ घेऊन कर्जखाती बेबाक करावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था आयुक्त व निबंधक अनिल कवडे, सहकारी संस्था कोल्हापूर विभागीय सहनिबंधक अरूण काकडे व बॅंकेच्या वतीने अवसायक सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केले आहे. या योजनेनुसार कर्ज खाते अनुउत्पादीत झाल्यानंतर कर्ज खाते डाऊटफूल नं.1 मध्ये गेलेच्या दिनांकारोजी असणारी मुद्दल व त्यावर त्या दिनांकापासून डाऊटफूल नं.3 पर्यंतच्या 36 महिन्यांच्या कालावधी पर्यंत 6 टक्के व्याजदराने व्याजाची आकारणी करून होणारे व्याज व या व्याजामध्ये डाऊटफूल नं.1 पर्यंतच्या कालावधीचे कर्जखातेवरील व्याज अधिक करून मुद्दल व व्याज एकत्रीत करून होणाऱ्या येणेबाकी रक्कमेमधून डि-1 दिनांकानंतर आजपर्यंत भरलेली रक्कम या योजनेत वजा केली जाते व त्यामध्ये वसुलीसाठी झालेला कायदेशीर खर्च, अवसायन खर्च हे अधिक केले जातात व अशी रक्कम कर्जदारास भरावी लागते. ज्यामुळे कर्जदारास व्याज रक्कमेमध्ये मोठ्या प्रमाणात सवलत मिळू शकते. यामध्ये कर्जदाराची व्याज रक्कम कमी झाल्याने बराचसा फायदा होत असल्याने कर्जदारांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेऊन कर्जखाती बेबाक करावीत. तसेच अशाच प्रकारची मयत कर्जदारांसाठी योजना असून त्यामध्ये डि-1 नंतर होणारे व्याज घेतले जाणार नाही. ही योजना दि.26 फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू असल्याने याचा लाभ सर्व कर्जदार खातेदारांनी घ्यावा. कर्जदार कर्जमुक्त झाल्याने त्यांच्या मालमत्तेवरील बँकेचे जप्ती बोजे कमी होऊन कर्जदारास नवीन कर्जाचा लाभ इतर बँकांकडून घेता येईल. तसेच कर्जदाराचे सिबील स्कोअर देखील यामुळे चांगला होणार आहे. ही योजना दि. 26 फेब्रुवारी 2024 नंतर बंद झाल्यास मात्र कर्जदारांच्या कर्जखात्यावर कर्ज उचललेल्या दिनांकापासूनचे आज तारखेपर्यंतचे तेव्हांच्या प्रचलीत व्याजदराने व्याजाची आकारणी करून संपूर्ण मुद्दल व व्याजाची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्यामुळे जे कर्जदार दि. 26 फेब्रुवारी 2024 पूर्वी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज भरणार नाहीत त्या कर्जदारांना दि. 26 फेब्रुवारी 2024 नंतर व्याज रक्कमेत कसलीही सूट मिळणार नाही व अशा कर्जदारांच्या, जामीनदारांच्या जंगम, स्थावर मालमत्ता यांची जप्त करून वसूलीची कायदेशीर कारवाई बँकेकडून केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जाची वसूली होऊन ठेवीदारांना त्यांची ठेव रक्कम परत करणे बँकेस शक्य होईल. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा