सोमवार, १५ जुलै, २०१९

तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगातून रोजगार निर्मिती करावी - सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांनी विविध क्षेत्रात युवकांना प्रशिक्षण देवून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा. उद्योगाची नवनवीन क्षेत्रे निर्माण होत असून युवकांनी नव्या वाटा शोधाव्यात नवनवीन कौशल्ये आत्मसात करावीत. कौशल्य प्रशिक्षण प्राप्त केल्यानंतर कोणत्याही ठिकाणी काम करत असताना आपल्यामधील कौशल्य वापरण्याची जिद्द व मनाची तयारी पाहिजे. तरूणांनी नव्या वाटा शोधत फक्त नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा उद्योग उभारून रोजगार निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
    जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीता खोत, करिअर मार्गदर्शक डॉ. संदीप पाटील, महानगरपालिकेचे प्रकल्प व्यवस्थापक बाळकृष्ण व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक एस. के. माळी, पुणे विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सागर मोहिते, उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील, गुरूकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन व्हनखंडे, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
    सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, उद्योग उभारणीसाठी मुद्रा योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडील योजनेमधूनही कर्ज वितरीत करण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक उद्योग सुरू करावेत. कष्ट व मेहनत केल्यास निश्चितच यश मिळेल. उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण, विविध योजनांच्या माध्यमातून पैसा उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त हिम्मत आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देवून उद्योग उभा करण्याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्वानुभव कथन केले.
    यावेळी महापौर संगीता खोत, जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अशासकीय सदस्य स्वप्नील शहा यांनी मार्गदर्शन केले. तसेच, डॉ. संदीप पाटील यांचे कौशल्य विकासातून करिअर संधी या विषयावर व्याख्यान झाले.
    यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील व्याज परतावा मिळालेल्या लाभार्थींचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला. या महामंडळाच्या योजनांची महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सर्जेराव पाटील यांनी सविस्तर माहिती दिली.  
यावेळी प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत सर्वाधिक रोजगार प्राप्त करून देणाऱ्या कार्यरत व्यवसाय प्रशिक्षण संस्थांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक प्राप्त ग्रीक्स, स्पंदन कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मिरज, व्दितीय क्रमांक रिसोर्स ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटर एज्युकेशन सोसायटी मिरज, तृतीय क्रमांक प्राप्त प्राप्त लियाड इन्स्टिट्युट ऑफ आर्ट ॲन्ड डिझाईन सांगली या प्रशिक्षण संस्थांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच श्रीयश एज्युकेशन ॲन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्युट मिरज व ग्रीक्स, करिअर पॉईंट कॉम्प्युटर अकॅडमी सांगली या प्रशिक्षण संस्थांना प्रोत्साहनात्मक प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी विविध प्रशिक्षण संस्थांनी त्यांच्या संस्थेकडून कौशल्य प्रशिक्षण प्राप्त करून रोजगार प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थींच्या यशोगाथांचे सादरीकरण केले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदन नृत्यासह सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
प्रास्ताविकात सहाय्यक संचालक एस. के. माळी यांनी जागतिक कौशल्य दिनाचा हेतू सांगून युवकांनी विविध प्रशिक्षण संस्थाव्दारे चांगले कौशल्य आत्मसात करून याचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा असे आवाहन केले. सूत्रसंचालन विजयदादा कडणे यांनी केले. आभार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी यांनी मानले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
    या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे सदस्य, विविध प्रशिक्षण संस्थांचे संचालक, प्रतिनिधी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी, प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा