शुक्रवार, २१ एप्रिल, २०२३

जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची अभियान यशस्वी करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 21 (जि.मा.का.) :- जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची हे अभियान जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय राखून शासकीय योजनांचा लाभ लाभार्थीना मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सूचना दिल्या. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महानगरपालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, दि. 15 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियानाचे समन्वय मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार असल्याने शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयात असे कक्ष स्थापन करून सामान्य माणसाला शासन योजनांचा लाभ मिळवून द्यावा. जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची या अभियानातून सांगली जिल्ह्यातून विविध शासकीय योजनांच्या ७५ हजार लाभार्थ्यांना एकाच दिवशी शासकीय योजनांच्या लाभ देण्यात येणार असून यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी बैठकीत सांगितले. या अभियानाच्या माध्यमातून होत असलेल्या कामांचा नियमित आढावा घेण्यात येणार असून जिल्हाधिकारी कार्यालयात निर्माण करण्यात आलेल्या कक्षाकडे याची माहिती विभागांनी दररोज पाठवावी. ही माहिती मुख्यमंत्री सचिवालयास नियमित पाठवली जाणार आहे. त्यामुळे या कामास प्राधान्य द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा