बुधवार, ५ एप्रिल, २०२३

विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी

सांगली दि. 5 (जि.मा.का.) : जिल्ह्यात अवैधपणे विनापरवाना कृषी निवेष्ठांची विक्री करणाऱ्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ कृषी अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय कृषी अधिकारी व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अथवा मोहीम अधिकारी यांना तात्काळ द्यावी. विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सांगली, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, सांगली, मोहिम अधिकारी जिल्हा परिषद सांगली, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी, मिरज, जत व विटा, तालुका कृषी अधिकारी, (सर्व), कृषी अधिकारी पंचायत समिती, (सर्व) अशा एकूण जिल्ह्यातील ३२ गुण नियंत्रण निरीक्षक मार्फत जिल्ह्यात अनधिकृतपणे खते, बियाणे व कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. जिल्ह्यातील तालुकास्तरावर असलेले तालुका तक्रार निवारण समिती, तालुका स्तरावर असलेले भरारी पथक तसेच जिल्हास्तरावरील भरारी पथक यांचेमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये कृषी सेवा केंद्र व त्या व्यतिरिक्त विनापरवाना कृषी निविष्ठाची विक्री करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. विना परवाना कृषी निविष्ठाची खरेदी न करणेबाबत शेतकरी बांधवांमध्ये जनजागृती करणे, मेळावे घेणे अवैध कृषी निविष्ठा खरेदी केल्यास होणाऱ्या नुकसानीची जाणीव करून देणे यासाठी कृषी विभागाने विशेष पथके स्थापन केली आहेत. या विशेष पथकांचे सनियंत्रण संबधित उपविभागीय कृषी अधिकारी यांचे मार्फत करण्याचे सूचित करण्यात येत असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रातून गुणवत्ता पूर्ण निविष्ठा शेतकऱ्यांना देण्याबाबत व निविष्ठा देताना सर्व कायदेशीर बाबींचे पालन करण्याविषयी सूचना दिल्या आहेत. अनियमीतता आढळणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यात सर्व गुण नियंत्रण निरीक्षक यांनी बियाण्याचे ९३.७८ टक्के, खताचे ९७.२६ टक्के व कीटकनाशके यांचे ९९.०३ टक्के इतके नमुने काढून विश्लेषणासाठी सादर केलेले होते, त्यामध्ये अप्रमाणित आलेल्या नमुन्याबाबत चालू वर्षी बियाणे २५ खते २१ कीटकनाशके १ याप्रमाणे कोर्ट केसेस दाखल केल्या आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण ८७ कृषी सेवा केंद्रांना विक्री बंद आदेश दिलेले असून २१ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द केलेला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी विनापरवाना किटकनाशके विक्री करणाऱ्या इसमांवर वाळवा तालुक्यातील बागणी येथे १४ लाख ५० हजार इतक्या रक्कमेचा मुद्देमाल जप्त करून फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मणेराजुरी येथे विनापरवाना खत उत्पादन करणाऱ्या दोन इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून ४६ मेट्रिक टन खत सुमारे ८ लाख ५० हजारांचा साठा जप्त केलेला आहे. पंचायत समिती इस्लामपूर कृषी अधिकारी संजय बुवा यांनी इस्लामपूर येथे विनापरवाना बियाणे विक्री करणाऱ्या इसमांवर एफ. आय. आर. दाखल करून सुमारे २३ लाख ५० हजार या किंमतीचा सोयाबीन बियाणाचा १०.५७ मेट्रिक टन इतका साठा जप्त केला आहे. वाळवा येथे औद्योगिक कारणासाठी युरिया या खताचा वापर व साठा करणाऱ्या व्यक्तींवर एफ. आय. आर. दाखल केलेला असल्याचे श्री. सुर्यवंशी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच बियाणे कीटकनाशके व रासायनिक खते यांची खरेदी करावी व त्याचे पक्के बिल घ्यावे. तसेच विनापरवाना विक्री करणाऱ्यांकडून कृषी निविष्ठांची खरेदी करू नये, असे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा