मंगळवार, २५ एप्रिल, २०२३

जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची अभियानाचा लाभ घ्या - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सांगली दि. 25 (जि.मा.का.) : शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी "जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची" हे अभियान राबविण्याचे शासनाने ठरविले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनाशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. कृषी विभागामार्फत 15 एप्रिल ते 15 जून 2023 दरम्यान हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी केले आहे. या अभियानांतर्गत सांगली जिल्ह्यामधील एकूण १५ हजार शेतकऱ्यांना योजनेमध्ये समाविष्ट करून घेणे, पात्र शेतकऱ्यांना पूर्व संमती देणे व अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्याचे कृषि विभागामार्फत नियोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांमध्ये अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्जाची नोंदणी करून घ्यावी. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत "प्रति थेंब अधिक पिक" या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ठिबक संच व तुषार संच करिता अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के व सर्वसाधारण शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदानाची तरतुद आहे व पूरक अनुदानामधून याच शेतकऱ्यांना अनुक्रमे 25 टक्के व 30 टक्के असे एकूण 75 टक्के व 80 टक्के अनुदानाची तरतुद आहे. कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅक्टर, पॉवर टिलर व ट्रॅक्टरचलित औजारे, औजारे बँक व ड्रोन यांसारख्या विविध घटकांकरिता 35 टक्के ते 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे. एकात्मिक फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार, सामुहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, प्लास्टिक मल्चिंग, संरक्षित शेती तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान अंतर्गत शीतगृह, पॅकहाऊप, शीतवाहन इ. घटकांकरिता 35 टक्के ते 50 टक्के अनुदानाची तरतूद आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणी व विस्तारीकरण याकरिता 35 टक्के अनुदानाची तरतूद आहे. फळबाग लागवडीकरिता इच्छुक शेतकऱ्यांपैकी अल्प- अत्यल्प भूधारक जॉब कार्डधारक शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीमध्ये फळबाग लागवड करिता अर्ज करावा व या योजनेमध्ये अपात्र ठरत असणाऱ्या बहुभूधारक शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत तरतुद असलेल्या 16 विविध फळपिकांकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाची शेततळ्याकरिता खोदकामासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते (14 हजार रूपये ते 75 हजार रुपये). या योजनांबरोबरच माती परिक्षण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा, सेंद्रीय शेती, कृषि सेवा केंद्राचे परवाने वितरित करणे इत्यादी महत्वाच्या योजना लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची हे अभियान राबविण्यात येत असून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा