गुरुवार, ६ एप्रिल, २०२३

आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नाले सफाईचे काम तातडीने पूर्ण करा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली, दि. 6, (जि. मा. का.) : आगामी मान्सून काळात संभाव्य पूर व आपत्तीजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे. महापालिका आणि जिल्हा परिषदेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील नाले सफाईच्या कामाला गती देवून ही कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आगामी मान्सून पूर्व तयारी आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महापालिका आयुक्त सुनिल पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संभाव्य आपत्तीच्या नियंत्रणासाठी विभागांनी आपआपल्या स्तरावर बैठका घेवून नियोजन करावे, अशा सूचना देवून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पावसाळ्यात नाले वाहते राहण्यासाठी ते स्वच्छ करण्याबरोबरच नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यास संबंधितांनी काम करणे गरजेचे आहे. हरिपूर येथील नाला सफाई संदर्भात महापालिका आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नाले सफाई तातडीने करावी. मान्सून व संभाव्य आपत्तीबाबत गावा-गावात जनजागृती करावी. गावातील एनजीओंची बैठक घ्यावी. आपत्तीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या आपदा मित्रांची यादी तयार करावी आणि ती जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्षास पाठवावी, अशा सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. संभाव्य आपत्तीमध्ये काम करण्यासाठी जिल्हास्तरावरून 300 आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आवश्यक किट उपलब्ध करून दिले आहे. ज्या ग्रामपंचायती किंवा शासकीय कार्यालयांमध्ये पूर येण्याची शक्यता आहे, अशा कार्यालयातील शासकीय दस्ताऐवज सुस्थितीत राहण्यासाठी विषयवार गठ्ठे बांधून ठेवावेत. संभाव्य पूरपरिस्थितीमध्ये नागरिकांनीही अत्यावश्यक बाबीचे किट तयार ठेवावे जेणेकरून स्थलांतराची गरज पडल्यास हे किट यावेळी वापरता येईल. यापूर्वी पूरपरिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी नागरिकांची सोय करण्यात आली होती त्या निवारा ठिकाणची पाहणी करून आवश्यकता भासल्यास दुरूस्तीही करून घ्यावी. याबरोबरच जनावरांसाठी निवारागृहे, चारा याचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्ती व पूल दुरूस्ती कामे, आरोग्य विभागाने मान्सून कालावधीत आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. ग्रामीण भागासाठी प्रशासनामार्फत टंचाई आराखडा तयार करण्यात आला असून याबाबत यंत्रणांनी त्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा