बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान आज सांगलीत

सांगली दि. 23 (जि.मा.का.) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत उद्या दि. 24 ऑगस्ट रोजी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होत आहे. या अभियानाच्या तयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबंधित विभागांच्या कामाचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला. यावेळी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या अभियानासाठी दिव्यांग बांधवांची ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावण्यात आले असून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. या बरोबरच दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा