मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

'मेरी माटी मेरा देश' उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 1 (जि.मा.का.): मेरी मिट्टी मेरा देश' हा उपक्रम 9 ते 15 ऑगस्ट कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शिलाफलकम, पंच प्रण शपथ व सेल्फी, वसुधा वंदन, वीरांना वंदन आणि ध्वजारोहण व राष्ट्रगाण असे कार्यक्रम होणार आहेत. या उपक्रमासाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करून लोकसहभागातून उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. 'मेरी माटी मेरा देश' उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहातून दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. बैठकीस प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, नगर प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त ज्ञानेश्वर ढेरे प्रत्यक्ष उपस्थित होते तर महापालिका आयुक्त सुनील पवार, उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी यांनी सांगितले, आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत राज्यासह देशभरात 'मेरी माटी मेरा देश उपक्रम राबविण्यात येत आहे. गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेत लोकसहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. या उपक्रमांतर्गत गावातील, शहरातील संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकमची उभारणी करा. या शिलाफलकमवर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींची नावे द्यावीत. लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी दिवे घेवून पंच प्रण शपथ घ्यावी. गावातील योग्य ठिकाण निवडून ‘वसुधा वंदन’ म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करावी. देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करा, अभियानांतर्गत गावात योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवून तिरंगा फडकवण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करा. तालुकास्तरीय समितीच्या बैठका घ्या. वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी वनविभागाकडे करा, उपक्रमातील कार्यक्रमांची प्रचार प्रसिद्धी करा, उपक्रमात राष्ट्रध्वजाचा वापर करताना ध्वजसंहितेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार करावा, पोलीस विभागाने पोलीस स्टेशननिहाय व चेक पोस्टच्या ठिकाणी बॅनर, पोस्टर लावावेत. परिवहन विभागाने एस.टी.बसेसवर व एस.टी. स्टँडवर उपक्रमाची जाहिरातीव्दारे जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. 000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा