शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

24 ऑगस्टला धनंजय गार्डन येथे आयोजन सांगली, दि. 18 (जि. मा. का.) : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे येत्या 24 ऑगस्टला नियोजन करण्यात आले आहे. धनंजय गार्डन, कर्नाळ रोड येथे सकाळी 11 वाजल्यापासून हे अभियान होणार आहे. या अभियानात गरजेनुसार दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून त्यांना शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्रातिनिधीक स्वरूपात दिली जाणार आहेत. तरी दिव्यांग बांधवांनी या अभियानाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे केले. या अभियानाच्या तयारीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, महानगरपालिका उपायुक्त स्मृती पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाळासाहेब कामत, मंजिरी देशपांडे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे व महामंडळांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. दिव्यांगांच्या तक्रारींचा त्याच ठिकाणी निपटारा करण्याठी हे अभियान होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, हे अभियान यशस्वी करण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निहाय नोडल अधिकारी तसेच दिव्यांगांची व्यवस्था पाहण्यासाठी क्षेत्रनिहाय कर्मचारी नेमावेत. दिव्यांग बांधवांची ने – आण करण्यासाठी वाहन व्यवस्था, पाणी व भोजन व्यवस्था, अन्य आवश्यक सोयी सुविधा, रँप, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृहे, व्हील चेअर आदि बाबींचे काटेकोर नियोजन करावे. आवश्यक निधी, स्टॉलची उभारणी याबाबत जिल्हा परिषद व महानगरपालिकेने व्यवस्था पाहावी, असे त्यांनी सूचित केले. दिव्यांगांना दैनंदिन जीवनात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या तक्रारी, अडीअडचणींचा निपटारा होऊन शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे सुलभरीत्या प्राप्त होण्यासाठी हे अभियान फायदेशीर ठरणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले. या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, तसेच शासनाच्या नियंत्रणाखालील महामंडळे व इतर संस्था यांचे स्टॉल लावून एकाच छताखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्यक असणारी प्रमाणपत्रे, दाखले, योजनांची माहिती व इतर अनुषंगिक सुविधा देण्यात येणार आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा