शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

लम्पी चर्मरोग; फवारणी व लसीकरणास प्राधान्य द्या जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या सूचना

सांगली दि. 18 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नियमित फवारणीसह गोवंशीय पशुधनाचे तातडीने लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग, जिल्हा अधीक्षक विवेक कुंभार, सहायक निबंधक उर्मिला राजमाने आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, जिल्ह्याच्या काही भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे. यासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या ज्या भागात लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव जाणवत आहे त्या ठिकाणी लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. बाधित जनावरांचे आयसोलेशन, औषधोपचार, लसीकरण याबाबत आवश्यक खबरदारी घेऊन पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. लसीकरण व फवारणीसाठी पथके कार्यरत ठेवावीत. लम्पी चर्मरोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांचे बाजार बंद करणे, शर्यती बंद करणे, जनावरांची वाहतूक बंद करणे आदी उपाय योजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा