गुरुवार, २४ ऑगस्ट, २०२३

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची सांगली जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करावी - राज्य समन्वयक नेहा गुंजू

- पीएमएफएमई योजनेची कार्यशाळा संपन्न सांगली, दि. 24 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन सहाय्यित महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत सध्या कार्यरत असलेल्या व नवीन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांच्या विस्तारासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. वैयक्तिक व गट लाभार्थींनी या योजनेचा लाभ घ्यावा. सांगली जिल्ह्यात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी करावी, असे आवाहन योजनेच्या राज्य समन्व्ययक नेहा गुंजू यांनी आज येथे केले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक जाभवंत घोडके, विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे, अन्न तंत्रज्ञान व्यवस्थापक अमोल ढाकणे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वासराव वेताळ, कृषि उपसंचालक प्रियांका भोसले आदि उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. योजनेचे महाराष्ट्रात सर्वाधिक लाभार्थी आहेत. त्यामुळे सांगली जिल्ह्याकडूनही अधिक अपेक्षा असल्याचे सांगून नेहा गुंजू म्हणाल्या, जिल्हा प्रशासन, स्टार्ट अप, शेतकरी, स्वयंसहाय्यता गट, महिला यांच्या समन्वयाने या योजनेची सांगली जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी होत आहे. पात्र इच्छुकांपर्यंत या योजनेची माहिती व लाभ पोहोचवा. या माध्यमातून त्यांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना आर्थिक, व्यावसायिक, तांत्रिक सहाय्य देण्यात येत आहे. तरी प्रगतशील शेतकरी, नवउद्योजक, बेरोजगार युवक-युवती, महिला, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, खाजगी संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा. त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये राज्यात अव्वल राहण्यासाठी योगदान द्यावे, असे त्या म्हणाल्या. विपणन व्यवस्थापक सत्यवान वराळे यांनी मार्केटिंग व ब्रँडिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे शंकानिरसन केले. प्रकल्प संचालक आत्मा जाभवंत घोडके यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात प्रियांका भोसले यांनी योजनेच्या सांगली जिल्ह्यातील कामगिरीचा आढावा सादर केला. आभार उपविभागीय कृषि अधिकारी विटा विवेकानंद चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेस बँकांचे प्रतिनिधी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, लघु उद्योजक, स्वयंसहाय्यता गटाच्या प्रतिनिधी, आत्माचे गटप्रतिनिधी आदि उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा