सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

अप्रमाणित व अवैध वजन, मापे वापरणे बेकायदेशीर

सांगली दि. 28 (जि.मा.का.) : अप्रमाणित व परदेशातून आयात केलेले वजन काटे व वैध परवाना नसलेल्या व्यक्तींनी तयार केलेले अवैध वजन काटे विक्री करणाऱ्यांच्या विरोधात विशेष तपासणी मोहिम वैधमापन शास्त्र विभागाकडून हाती घेण्यात येत आहे. अप्रमाणित अवैध वजन काटे याचा वापर व विक्री संबंधितांनी त्वरीत थांबवावी, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल व अशी अवैध वजन काटे जप्त केली जातील. वैध परवाना नसलेल्या व्यक्तिीने सुध्दा अप्रमाणित वजन काट्याचे उत्पादन व विक्री त्वरीत थांबवावी, असे आवाहन वैधमापन शास्त्र सांगली कार्यालयाचे उपनियंत्रक द. प्र. पवार यांनी केले आहे. केंद्र शासनाकडून वैध प्रतिकृती मान्यता प्रमाणपत्र घेवून वैधमापन शास्त्र कायद्यातील तरतुदीनुसार तयार केलेली व स्थानिक निरीक्षकांव्दारे विहित पद्धतीने पडताळणी मुद्रांकन केलेली वजन मापे व तोलन उपकरणे हि प्रमाणित वजन माप असून अशीच वजन मापे व्यवहारात किंवा सुरक्षेकरिता वापरणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. वैध मापन शास्त्र कायद्यातील तरतुदीनुसार जी प्रमाणित नसतील अशा अवैध वजन मापांचा वापर कायद्याने प्रतिबंधित केलेला असून ती जप्त करून वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद वैधमापन शास्त्र कायद्यात आहे. त्यामुळे वैध प्रमाणित वजन मापे व इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर उपयोगकर्त्यांनी आपल्या व्यवहारात करावा, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे. अवैध व अप्रमाणित वजन मापांच्या वापरामुळे अचूक मोज मापाची खात्री देत येत नसल्याने उपयोगकर्त्यांना आपल्या व्यवहारामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते, शिवाय यामध्ये फसवणुकीच्या दृष्टीने सहजासहजी फेरफार केला जाण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे उपयोगकर्त्यांनी अशा अवैध वजनमाप व इलेक्ट्रॉनिक काट्यांचा वापर त्वरित थांबवावा. कोणत्याही वजन मापांची उत्पादन विक्री व दुरुस्ती या बाबी वैधमापन शास्त्र कायद्याव्दारे नियमित केल्या जात असल्याने त्या करण्यासाठी वैध परवान्याची आवश्यकता असते. त्यामुळे वैध परवाना नसलेल्या व्यक्तींनी वजन मापाचे उत्पादन, विक्री व दुरुस्ती करू नये. अशी कृती बेकायदेशीर असून या करिता कायद्यात दंडाची तरतूद आहे. त्यामुळे परदेशातून आयात केलेले परंतु शासनाचे वैध प्रतिकृती मान्यता प्रमाणपत्र नसलेले व वैध परवान्याशिवाय सुटे भाग एकत्र करून बनविलेले अशी वजन मापे व इलेक्ट्रोनिक काटे अप्रमाणित असून त्यांची विक्री व वापर कोणत्याही व्यक्तींनी करू नये. ऑनलाईन ई कॉमर्स साईटवरुन वजन मापे खरेदी करणाऱ्यांनीसुध्दा कायदेशीर बाबीची खात्री करुनच वजन काटे खरेदी करावेत. विक्रेत्यांनी सुध्दा कायद्यातील तरतुदीची पुर्तता होत असल्याची खात्री करावी, असे आवाहन श्री. पवार यांनी केले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा