सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

“ हर घर तिरंगा" मोहिमेसाठी टपाल खात्यात 25 रुपयात मिळणार राष्ट्रध्वज

सांगली, दि. 7 (जि. मा. का.) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक यांच्या आठवणी तसेच देशभक्तीची भावना जनमानसात कायम रुजावी, या उद्देशाने गतवर्षी 15 ऑगस्टला 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला देशवासियांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आपल्या देशाबद्दल असलेला अभिमान आणि स्वातंत्र्यदिनाचे स्मरण करण्यासाठी ही मोहीम यशस्वी झाल्यामुळे यंदाही केंद्र आणि राज्याकडून 'हर घर तिरंगा २.०' मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना तिरंगा ध्वज विकत घेणे सुलभ व्हावे म्हणून भारतीय पोस्ट विभागात अवघ्या 25 रुपयात तिरंगा ध्वज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अशी माहिती सांगलीचे प्रवर अधीक्षक डाकघर आर. पी. पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. यंदाही 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनासाठी टपाल विभागाकडून 25 रूपये प्रति ध्वज अशा किफायतशीर दराने दर्जेदार राष्ट्रीय ध्वजांची विक्री आणि वितरण करण्यात येत आहे. पोस्ट विभागाच्यावतीने सरकारी/ खासगी संस्था, कॉर्पोरेशन, स्थानिक स्वराज्य संस्थांनी पोस्ट विभागाकडे त्यांच्या कार्यालयासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय ध्वजाची आवश्यकता असल्यास १० ऑगस्टपर्यंत कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. झेंडा ऑनलाइन पद्धतीने सुद्धा ग्राहक खरेदी करू शकतात. ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांनी www.epostoffice.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा