मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

नेत्र तपासणी आरोग्य शिबीराचा वाहन चालकांना लाभ घेण्याचे आवाहन

सांगली दि. 22 (जि.मा.का.) : वाहन चालकाच्या आरोग्याची तसेच दृष्टी तपासणीकरिता परिवहन विभागामार्फत संपूर्ण राज्यात नेत्र तपासणी आरोग्य शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली मार्फत दि. 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सावळी येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात नेत्र तपासणी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. भारतामध्ये रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या आहे. भारतामध्ये दरवर्षी जवळपास 1 लाख 60 हजार व्यक्ती रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमवतात. कित्येक लोकांना अपघातामुळे कायमचे अपंगत्व येते. अशा व्यक्तींना व कुटुंबियांना अनेक आर्थिक व मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. रस्ता सुरक्षा ही परिवहन विभागाच्या महत्वाच्या जबाबदारी पैकी एक आहे. या करिता परिवहन विभागामार्फत रस्ता सुरक्षेसंदर्भात संबंधित विभागांच्या बैठका आयोजित करून विविध उपाययोजना राबविण्यात येतात. भारतातील रस्ते अपघाताचे विश्लेषण केले असता बहुतांश अपघातास वाहनचालक कारणीभूत असतात. वाहन चालकाच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यात त्याचे संपूर्ण आरोग्य व दृष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे. याकरिता नेत्र शिबीराचे आयोजन करण्यात आले असून सर्व वाहनचालक, वाहनमालक, प्रवाशी वाहतूक संघटना, बस संघटना, माल वाहतूक संघटना यांना नेत्र शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी केले आहे. तपासणी नंतर सर्व वाहन चालकांना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा