मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

लम्पी चर्मरोग; शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 22 (जि.मा.का.) :- लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील गोवंशीय पशुधनाचे येत्या शनिवारपर्यंत लसीकरण पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे, डॉ. एच. डी. पठाण, डॉ. महादेव गवळी, डॉ. विजय ढोले, डॉ. शरद सोनवणे, डॉ. शिरमनवार आणि डॉ. देशपांडे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लम्पी चर्मरोगाचा फैलाव रोखण्यासाठी स्वच्छता महत्वाची असून पशुपालकांनी यास प्राधान्य द्यावे. याबरोबरच ग्रामपंचायतींनी नियमित औषध फवारणी करावी. या रोगाने बाधित जनावरांचे आयसोलेशन करावे. आत्तापर्यंत 65 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले असून उर्वरित पशुधनाचे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करा, अशा सूचना त्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. लम्पी चर्मरोगाबाबत मार्गदर्शन व उपचार याबाबत सल्ला देण्यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांच्याकडील पथक जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा