बुधवार, २ ऑगस्ट, २०२३

बीएलओंच्या 21 ऑगस्टपर्यंत घरोघरी भेटी, अचूक मतदार यादीसाठी सहकार्याचे आवाहन

सांगली, दि. 2 (जि. मा. का.) : मतदार यादीच्या पुनरिक्षण पूर्व उपक्रमामधील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन पडताळणी करण्याचा उपक्रम दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2023 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या कालावधीत संबंधित भागातील बीएलओ हे मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलाची पडताळणी संबंधित कुटुंबप्रमुखाकडून माहिती घेऊन करत आहेत. मतदार यादी अचूक होण्यासाठी नागरिकांनी व राजकीय पक्षांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन 281-मिरज विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक शिंदे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने 281-मिरज विधानसभा मतदार संघातील बीएलओ प्रामुख्याने मतदार यादीत नाव नसलेले पात्र नागरिक, संभाव्य मतदार, 1 जानेवारी 2024 रोजीच्या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे तसेच 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑगस्ट 2023 या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र मतदार, दुबार नोंदी, मयत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, यादीत दुरुस्ती अशा मुद्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करीत आहेत. मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण व मतदार यादी, मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे आदि कामे दि. 22 ऑगस्ट ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहेत. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 व अंतिम मतदार यादी 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती सादर करण्यासाठी नमुना अर्ज तहसिल कार्यालय मिरज (निवडणूक शाखा) अथवा बीएमओ मार्फत सादर करण्यात येणार आहेत किंवा ऑनलाईन अर्ज Voter Service Portal, Voter Portal या संकेतस्थळावर व Voter Helpline Mobile App वर देखील सादर करता येतील. या मोहिमेसंदर्भात नागरिकांना किंवा मतदारांना कोणतीही अडचण आल्यास त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक शाखेशी संपर्क साधावा. बीएलओ यादी तहसिल कार्यालयात उपलब्ध असल्याचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार मिरज डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा