सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा युवा महोत्सव आयोजनाची बैठक संपन्न

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : सन २०२३ – २४ च्या जिल्हा स्तरावरील युवा महोत्सवाच्या आयोजनाची बैठक जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या बैठकीस क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकऱ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, नेहरू युवा केंद्राचे सागर व्हनमाने यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते. जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 30 नोव्हेंबरपूर्वी आयोजन करावे. महोत्सव आयोजनाबाबतची सर्व प्रक्रिया शासन नियमानुसार पार पाडावी. महोत्सवाची व्यापक प्रसिद्धी करावी. तसेच अंमली पदार्थ विरोधी पथनाट्यांना महोत्सवात सहभाग द्यावा, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केल्या. बैठकीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे स्वरूप व बाबी, स्पर्धेचे ठिकाण व दिनांक, तज्ज्ञ परीक्षक नियुक्ती यासह अन्य अनुषंगिक विषयांवर चर्चा करण्यात आली. युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी दर वर्षी जिल्हास्तरावर युवा महोत्सव आयोजित केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिली आहे. या महोत्सवामध्ये समूह व वैयक्तिक लोकनृत्य, लोकगीत कथा लेखन, पोस्टर लेखन, वक्तृत्त्व स्पर्धा, फोटोग्राफी, संकल्पना आधारीत स्पर्धा तसेच हस्त कला, ॲग्रो प्रॉडक्ट आदि प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगट राहील. जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवा स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र राहतील. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा