शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

दीड हजार रोहित्रांकरिता निधी उपलब्ध करून देण्याची पालकमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे विनंती

- वीज वितरणासाठी 1673 रोहित्रांची आवश्यकता - विशेष बाब म्हणून 73.50 कोटी निधीची मागणी सांगली, दि. ३ (जि. मा. का.) - सांगली जिल्ह्यामधील कृषी पंपासाठी वाढत्या वीज मागणीनुसार वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच संभाव्य दुष्काळ परिस्थिती विचारात घेवून त्वरित उपाययोजना करण्यासाठी अतिरीक्त वितरण रोहित्रे उभा करणे आवश्यक आहेत. जिल्ह्यासाठी 1 हजार 673 रोहित्रांकरिता (TC) 73.50 कोटी रूपये निधीची आवश्यकता असून, सदरचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून मिळावा, अशी विनंती कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली. याबाबत सविस्तर तपशील देणारे निवेदन डॉ. खाडे यांनी आज प्रत्यक्ष भेटून उपमुख्यमंत्र्यांना सादर केले. यावेळी खासदार संजय पाटील उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर हे तालुके आणि मिरज तालुक्याचा पूर्व भाग हा यापूर्वी पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेमुळे दुष्काळी भागामध्ये मोडत होता. यापूर्वी या क्षेत्रामध्ये रोहित्राच्या एकूण क्षमतेपेक्षा एकाचवेळी 50 टक्क्यांपेक्षा कमी विजेचा वापर होत असल्याने प्रत्येक रोहित्रावर क्षमतेपेक्षा दीडपट म्हणजेच 100 के.व्ही.ए. क्षमतेच्या रोहित्रावर 150 के.व्ही.ए. वीजभार मंजूर करण्यात आला होता. अलीकडच्या काळामध्ये टेंभू, ताकारी, म्हैसाळ इ. उपसासिंचन प्रकल्पांमुळे या क्षेत्रामध्ये पाणी उपलब्ध झाले आहे आणि त्यामुळे कृषीपंपाच्या वीज मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. सदर वाढलेल्या वीज मागणीमुळे वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा कमी पडत असून वितरण रोहित्रे (TC) अतिभारीत होऊन नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वीज पुरवठ्यामध्ये वारंवार व्यत्यय येत आहे. वीज वितरण व्यवस्थेमध्ये नवीन उपकेंद्राची उभारणी, उपकेंद्रांची क्षमतावाढ, नवीन वितरण रोहित्र उभारणी आणि वितरण रोहित्रांची क्षमतावाढ अशा स्वरूपाची कामे आवश्यक आहेत. त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये याबाबत केंद्र शासनाच्या RDSS (REVAMPED DISTRIBUTION SECTOR SCHEME) अंतर्गत आराखडा तयार करण्यात आला असून त्यासाठी 2071 कोटी रूपयांचा प्रकल्प अहवाल पाठविण्यात आला आहे. याबाबत निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्षात कामकाज होण्यास विलंब लागणार आहे. वरील सर्व परिस्थिती पाहता व संभाव्य दुष्काळाची परिस्थिती पाहता टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीमधून अखंडित पाणी उपसा झाल्यास पिण्याचे व सिंचनाचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणे शक्य आहे. त्यासाठी विद्युत व्यवस्थेचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पाणी उपलब्ध असूनही विजेअभावी हे पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी उपलब्ध होणार नाही. त्यासाठी संभाव्य दुष्काळ परिस्थिती विचारात घेवून त्वरित उपाययोजना करण्यासाठी अतिरीक्त वितरण रोहित्रे उभा करणे आवश्यक असून 1 हजार 673 रोहित्राकरिता (TC) 73.50 कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे. सदरचा निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून करून देणेबाबत संबंधितांना आदेश व्हावेत, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा