गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०२३

कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी आत्तापर्यंत 2 हजाराहून अधिक कुणबी नोंदी आढळल्या सांगली, दि. 9 (जि. मा. का.) : कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 8 नोव्हेंबरअखेर 10 लाखांवर दस्तावेजांची तपासणी करण्यात आली असून, नागरिकांकडे याबाबत काही कागदोपत्री पुरावे असल्यास त्यांनी संबंधित तालुकास्तरीय कक्षाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले. मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. त्यानुसार सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष कक्षांमार्फत 8 नोव्हेंबरअखेर 10 लाख 6 हजार 655 दस्तावेजांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या दस्तावेजातून 2 हजार 211 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. यामध्ये मराठी भाषेतील 2 हजार 157 व मोडी लिपीतील 54 नोंदींचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या दस्तावेजामध्ये मिरज तालुक्यात 4 लाख 25 हजार 518 तपासणी करण्यात आली. यामध्ये 183 नोंदी आढळून आल्या. तासगाव तालुक्यात 2 लाख 5 हजार 784 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 546 नोंदी आढळून आल्या. कवठेमहांकाळ तालुक्यात 50 हजार 977 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 41 नोंदी आढळून आल्या. जत तालुक्यात 3 हजार 205 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. खानापूर- विटा तालुक्यात 77 हजार 537 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 16 नोंदी आढळून आल्या. आटपाडी तालुक्यात 27 हजार 803 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. कडेगाव तालुक्यात 22 हजार 381 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 13 नोंदी आढळून आल्या. पलूस तालुक्यात 41 हजार 562 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 3 नोंदी आढळून आल्या. वाळवा तालुक्यात 75 हजार 416 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 605 नोंदी आढळून आल्या. शिराळा तालुक्यात 1 हजार 723 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबीच्या 804 नोंदी आढळून आल्या व अपर तहसील सांगलीमध्ये 74 हजार 749 दस्तऐवजाची तपासणी केली असता कुणबी नोंदी आढळून आल्या नाहीत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा