सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

विकसित भारत संकल्प यात्रेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 20 (जि. मा. का.) : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित वंचित लाभार्थींपर्यंत पोहोचावेत यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे, वंचित लाभार्थींची नोंदणी करणे व योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचवला जाणार आहे. तरी संबंधित सर्व विभागांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त सुनील पवार, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपसंचालक नगररचना ज्ञानेश्वर ढेरे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्राकडून नियुक्त पर्यवेक्षक तथा जिल्हा प्रभारी अधिकारी श्री. शुक्ला तसेच, जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते. या मोहिमेत सर्व विभागांनी सक्रिय योगदान द्यावे, असे सूचित करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, या मोहिमेंतर्गत ग्रामविकास, नगरविकास आणि अन्य महत्त्वाचे विभाग असे ३ प्रकारे वर्गीकरण करून पात्र वंचित लाभार्थींना लाभ द्यायचा आहे. प्रत्येक विभागासाठी त्यांच्या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही एक सुसंधी आहे. यामध्ये जिल्ह्यासाठी ६ व्हॅन प्राप्त होणार आहेत. प्रत्येक व्हॅन दर दिवशी दोन ग्रामपंचायतींमध्ये फिरणार आहे. या पद्धतीने २६ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या व्हॅन फिरणार आहेत. तरी प्रत्येक शासकीय विभागाने आपापल्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रचार-प्रसिध्दी, या मोहिमेचे सखोल नियोजन करावे. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, ग्रामीण/शहरी/नगरपालिका स्तरावर लाभार्थी शोधणे, प्रत्येक गरजू लाभार्थीपर्यंत योजनांची माहिती पोहोचविणे आणि त्या लाभार्थीस त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, यासाठी सर्व विभागप्रमुखांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. सांगली जिल्ह्यात या आठवड्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्याच्या अनुषंगाने सर्वांनी नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्री. शुक्ला म्हणाले, शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थींपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश असून, जिल्हा प्रशासनाने यासाठी योग्य ते नियोजन करून ही मोहीम यशस्वी करावी, मोहिमेच्या आधीच्या परिस्थितीची आणि नंतर झालेल्या बदलाची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी त्यांच्या कल्याणकारी योजना अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकसित भारत संकल्प यात्रा मोहिमेची माहिती केंद्र शासनाकडून राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने विविध शासकीय योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ पोहोचण्याच्या उद्देशाने, "विकसित भारत संकल्प यात्रा" या नावाची देशव्यापी मोहीम राबविली जात आहे. “जनजाती गौरव दिनी म्हणजे दि. १५ नोव्हेंबर रोजी या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून, सुरुवातीला लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या ११० जिल्ह्यांना आणि नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून दि २६ जानेवारी २०२४ पर्यंत उर्वरित जिल्ह्यांना ही यात्रा भेट देईल. या मोहिमेंतर्गत ग्राम/शहरी/नगरपालिका स्तरावर भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व स्तरांवरुन प्रयत्न केले जाणार आहेत. विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, माहितीचा प्रसार आणि योजनाबद्दल जागरूकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद - वैयक्तिक यशकथा / अनुभव शेअरिंगद्वारे सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणे, यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांद्वारे संभाव्य लाभार्थींची नोंदणी करणे, ही या विकसित भारत संकल्प यात्रेची उद्दिष्टे आहेत. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा