गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०२३

एच. आय. व्ही संसर्गित रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 23 ‍(जि. मा. का.) : एच. आय. व्ही सह जगणाऱ्या रूग्णांना शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ द्यावा. आयुष्मान कार्ड मिळवून देण्यासाठी, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत समावेशासाठी त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या. जिल्हास्तरीय एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात एचआयव्ही बधितांची संख्या घटत आहे ही समाधानाची बाब असल्याचे स्पष्ट करून डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एच. आय. व्ही. संसर्गिताचे आरोग्य, शिक्षण, रोजगार व आर्थिक मदत यावर भर द्यावा. त्यासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची छोटी माहिती पुस्तिका क्यू आर कोडसह तयार करावी. सर्व बाधितांना आयुष्मान कार्ड द्यावे. तसेच, पारंपरिक कारागिरांची नोंदणी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमध्ये करावी. मागणीनुसार कौशल्य विकास विभागाकडून व्यवसाय प्रशिक्षण द्यावे. त्याचबरोबर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीमध्ये त्यांच्या नावाच्या समावेशासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचित केले. डॉ. राजा दयानिधी म्हणाले, औषधोपचारांबरोबर पोषक आहार देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना, आर्थिक निकड दूर करण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, १८ वर्षांखालील निराधार मुलांना शैक्षणिक मदतीसाठी बालसंगोपन योजना, औषधोपचारासाठी प्रवासासाठी बस सवलत योजना यांचा लाभ देण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत. तसेच, साखर कारखानदारांना एच. आय. व्ही. संसर्गित रूग्णांना पोषक आहारासाठी देणगी देण्याचे आवाहन करावे. तसेच, ज्यांनी देणगी दिली आहे, त्यांचा सत्कार एड्स दिनाच्या कार्यक्रमात करावा, अशा सूचना दिल्या. गर्भवती मातांची पहिल्या तिमाहीत तपासणी करावी जेणेकरून सर्व संसर्गित मातांना वेळेत उपचार मिळतील व मातेपासून बाळाला होणारा एच. आय. व्ही. संसर्ग थांबविण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. यासाठी शहरी व ग्रामीण वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, एचआयव्ही संसर्गित रूग्णांना ए. आर. टी. सेंटरपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठपुरावा करावा. तसेच, अनिच्छुक रूग्णांचे विशेष समुपदेशन करावे. माहिती, शिक्षण व संवाद कार्यक्रमाद्वारे व तपासणीद्वारे संबंधित रूग्णांवर उपचार करावेत, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण रूग्णांची तपासणी व त्यामध्ये संसर्गितांचे प्रमाण, तालुकानिहाय एच. आय. व्ही. बाधित रूग्णसंख्या, ए. आर. टी. सेंटरमधील उपचार, सुरक्षा क्लिनिक, रक्तसुरक्षा कार्यक्रम, लक्ष्यगट हस्तक्षेप प्रकल्प, अतिजोखमीचे गट, स्थलांतरीत कामगार, एच. आय. व्ही – टी. बी. समन्वय, गर्भवती मातांची तपासणी व संसर्गाचे प्रमाण आदिंचा आढावा घेण्यात आला. जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी एड्स नियंत्रण कक्षामार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची सादरीकरणातून माहिती दिली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा